राज्यात दूध भेसळीची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. दूध भेसळीचे मोठे साम्राज्य पसरले आहे. दूध भेसळीचा प्रश्न गंभीर असून लहानग्या कच्च्या-बच्च्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. दूध भेसळ करुन सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तसेच दुधाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त दूध उत्पादनाच्या काळात सहकारी संस्थांना पावडर करुन एक्सपोर्ट करण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली.
शुक्रवारी सभागृहात बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यात दूधाच्या उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. येत्या काही काळात राज्यात एक कोटी लीटरपर्यंत दूधाचे कलेक्शन जाण्याची शक्यता आहे. मात्र दूध व्यवसायात काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. दूध भेसळ करणाऱ्यांचे मोठे साम्राज्य पसरले आहे. राज्यात दूध भेसळीची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. दूध भेसळ करुन लहानग्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. दूध भेसळीमुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. आघाडी सरकारच्या काळात दूध भेसळ करताना सापडल्यास त्याला फाशीची शिक्षा करण्याची तरतूद करण्याचा कायदा प्रस्तावित होता. मात्र राष्ट्रपती महोदयांनी या कायद्याला परवानगी दिली नाही, त्यामुळे हा कायदा झाला नाही. मात्र दूध भेसळ ही अत्यंत गंभीर समस्या असून दूध भेसळ करणाऱ्याला फाशीची तरतूद करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी
बळीराजाला अवकाळीची भरपाई मिळालीच पाहिजे… खोके सरकारचा उपयोग काय, शेतमालाला भाव नाय… शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा… कांद्याला ५०० रुपये अनुदान मिळालेच पाहिजे… अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा शुक्रवारी तेरावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.