कांदिवली पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने वकिलाला पोलीस ठाण्यातच मारहाण केली. त्यामुळे मंगळवार, १७ मार्च रोजी बोरिवली मेट्रोपॉलिटिन कोर्टात कार्यरत वकिलांच्या गटाकडून दबाव आल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
वकील पृथ्वी झाला हे कांदिवली पोलीस ठाण्यात गेले असता त्यांचा तिथे एपीआय हेमंत गीते यांना चुकून धक्का लागला. त्यावेळी एपीआय गीते यांनी वकील झाला यांना थेट थोबाडीत मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी गीते हे सध्या वेशात होते. या प्रकरणी वकील झाला यांनी सांगितले की, त्यांच्या मित्राच्या बहिणीला अपघातप्रकरणी अटक करण्यात आली होती, तिला जामीन मिळावा यासाठी ते पोलीस ठाण्यात गेले होते, जेव्हा ते पोलीस ठाण्यात पोहचले तेव्हा त्यांना महिला पोलीस कर्मचाऱ्याने बाहेर बसण्यात सांगितले. त्यावेळी वकील झाला हे बाहेर पडत असताना त्यांचा चुकून एपीआय गीते यांना धक्का लागला. त्यावेळी वकील झाला यांनी गीते यांची माफी मागितली, मात्र जेव्हा गीते यांना झाला हे वकील असल्याचे समजले तेव्हा त्यांनी थेट वकील झाला यांना मुस्कटात मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर वकील झाला यांनी त्यांचे सहकारी वकील इमाम नानूभाई यांना संपर्क करून आपल्याला पोलीस ठाण्यात मारहाण होत असल्याचे सांगितले. त्यानंतर वकील नानूभाई पोलीस ठाण्यात आले असता त्यांनी या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची माहिती दिली.
वरिष्ठ पोलीस अधिका-याने मागितली माफी पण एपीआयची मग्रुरी
त्यावेळी आधी वरिष्ठ पोलीस अधिकारी मारहाण झाल्याचे नाकारत होते. त्यानंतर वकील झाला यांनी एपीआय गीते यांना ओळखल्यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माफी मागितली, मात्र गीते यांना कोणतेही शल्य वाटत नव्हते, असे वकील नानूभाई म्हणाले. त्यामुळे वकिलांच्या गटाने पोलीस उपायुक्त यांची भेट घेतली. त्यावर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, तोवर गीते यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल, असे आश्वासन दिले आणि तसा आदेशही काढला. त्यावेळी वकिलांच्या गटाने पोलीस ठाण्यातील त्यावेळीचे सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी माहितीच्या अधिकाराखाली केली आहे, असेही वकील नानूभाई म्हणाले.
(हेही वाचा नवीन पेन्शन योजनेत भाजपा-शिवसेना सरकार करणार सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय)
Join Our WhatsApp Community