लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी अठरापगड जातीसाठी काम केले. गोपीनाथ मुंडे हे आपल्या कामामुळे लोकनेते या बिरूदाचे मुकुटमणी होते, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शनिवारी, नांदूरशिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांवर चालणारे असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आश्वासन देत अवकाळी पाऊसाने झालेल्या नुकसानीची भरपाई शासन देणार, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला.
राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना नजरेसमोर ठेवून योजना आखल्या आहेत. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत भरघोस तरतुद केली आहेत. उसतोड कामगारांच्या मुलांसाठी प्रमुख शहरांमध्ये वसतीगृह उभारण्यात येतील. उसतोड कामगार महामंडळास निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे आश्वासन देऊन मुख्यमंत्री शिंदेंनी गोपीनाथ मुंडे यांना विनम्र अभिवादन केले.
मुंडे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊ – नितीन गडकरी
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर होते. समाजातील तळागाळातील नागरिकांसाठी ते योद्धे होते. दलित, पीडित, शोषित, गरीब समाजाला न्याय देण्यासाठी आपले आयुष्यपणास लावले. कृष्णाखोरे, तापी पाटबंधारे विदर्भ सिंचनाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले. मानवतेच्या, एकतेच्या, समतेच्या आधारावर सर्व समाजाचा विकास होण्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रयत्नशील होते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विविध योजना राबवाव्या लागतील. शेतकरी अन्नदाताबरोबरच ऊर्जा दाता बनला पाहिजेत. स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट व्हिलेज ही संकल्पना अंमलात आणणे गरजेचे आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
(हेही वाचा – शिंदे-भाजपसोबत युती नाही, फक्त पाठिंबा; जागावाटपावरील बावनकुळेंच्या वक्तव्यावर बच्चू कडूंचे खळबळजनक विधान)