प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी शनिवारी दुपारी थेट मातोश्रीवर जात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांची भेट घेतली. येत्या काळात मुंबई पालिकेची निवडणूक होऊ घातलेली असताना, दक्षिणेकडील सर्वमान्य अभिनेत्याने ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ही राजकीय भेट नसून, केवळ सदिच्छा भेट असल्याचे ठाकरे गटाकडून सांगितले जात आहे. याआधी २००८ मध्ये ‘रोबोट’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी रजनीकांत मुंबईत आले होते. तेव्हा त्यांनी ‘मातोश्री’वर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली होती. त्यानंतर तब्बल १५ वर्षांनी ते मातोश्रीवर आले. रजनीकांत घरी आल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांनाही त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. आदित्य ठाकरे यांनी हा फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे.
दाक्षिणात्य मतांवर प्रभाव पडणार?
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंची सेना एकाकी पडली आहे. अशावेळी पालिका निवडणुकीत दाक्षिणात्य मतदारांची साथ मिळवण्यासाठी ठाकरेंकडून प्रयत्न केले जात आहेत. आदित्य ठाकरे यांनी अलिकडेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि त्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राजकारणासह अन्य बाबींवर चर्चा केली. त्यानंतर आता दक्षिणेकडील सर्वमान्य अभिनेते रजनीकांतही मातोश्रीवर पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
(हेही वाचा – शिंदे-भाजपसोबत युती नाही, फक्त पाठिंबा; जागावाटपावरील बावनकुळेंच्या वक्तव्यावर बच्चू कडूंचे खळबळजनक विधान)