आशिया खंडातील भारताच्या शेजारील छोट्या गरीब राष्ट्रांना पैशाच्या जोरावर आपल्या दबावाखाली आणणारा चीन आता हीच नीती आफ्रिका खंडातील देशांवर वापरत आहे. आफ्रिका खंडातील देशांना कर्ज देऊन त्यांना आर्थिक गुलाम बनवून तिथे सैनिकी तळ स्थापन करण्याची तयारी चीनने सुरू केली आहे. यासाठी चीनने १३ देशांची निवड केली आहे. यापूर्वी पूर्व आफ्रिकेतील जिबूती देशात चीनने सैन्यतळ बनवला आहे.
४६ बंदरांची निर्मिती
चीनचा दावा आहे की, जिबूती येथील सैनिकी तळ केवळ प्रशासकीय आवश्यकतांसाठी आहे. चीन असे सांगत असला तरी तेथे त्याने त्याच्या लढाऊ नौका तैनात केल्या आहे. सध्या तेथे ४० चिनी नौसैनिक आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने २०२१ च्या अहवालात म्हटले होते की, चीन आफ्रिका खंडातील देशांत त्याचा सैनिकी तळ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या त्याने तेथील ४६ बंदरांची निर्मिती केली आहे किंवा त्यांना अर्थसाहाय्य केले आहे. ही बंदरे चीनकडून संचालित केली जात आहेत. चीनने मोझांबिक देशातील बीरा येथे नौदलाचा तळ विकसित केला आहे. चीन आफ्रिकेच्या पश्चिम किनार्यावरील इक्वेटोरियल गिनी देशामध्येही सैन्यतळ बनवण्याचा विचार करत आहे. चीनने या देशाला कर्ज दिलेले आहे.
Join Our WhatsApp Community