अंदमानातील सामाजिक क्रांती

150

स्वातंत्र्यवीर सावरकरांची पन्नास वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा निश्चित झाली. बालपणीच त्यांनी महाकाव्य लिहिण्याचं स्वप्न पाहिलं होतं. कारागृहात वेळ घालवण्याचं साधन म्हणून सावरकरांनी महाकाव्य लिहून कारागृहातून मुक्तता होईल तेव्हा मातृभूमीच्या चरणी एक काव्यरूपी नवोपहार अर्पण करण्याचं निश्चित केलं. मुंबईत डोंगरी, भायखळ्याच्या कारागृहात त्यांनी काव्य लेखनाला सुरुवातही केली. लेखन साहित्य मिळत नसल्यामुळे त्यांनी काट्या, खिळ्याची लेखणी करून सहा साडेसहा सहस्र ओळींचं काव्य लिहिलं. पण त्यांनी केवळ स्वत:चा जीव रमवण्याचा विचार केला नाही तर त्यांच्यातला समाज क्रांतिकारक सदैव सजग होता.

( हेही वाचा : वीर सावरकर कराटे अ‍ॅकेडमीच्या नारायणी आणि कशिशने जिंकले सुवर्णपदक!)

बंदिवानांचं शिक्षण

सेल्युलर कारागृहात जे राजबंदिवान होते ते बरेचसे विशी पंचविशीतील होते. त्यांचं शिक्षण अपुरं राहिलेलं होतं. तेलाच्या घाण्याला जुंपलं गेल्यावर आपलं जीवन व्यर्थ आहे अशी भावना प्रत्येकाच्याच मनात उत्पन्न होत होती. स्वदेशप्रीती, धैर्य त्यांच्यात होतंच. त्याला शिक्षणाची, ज्ञानाची, विचारांची जोड मिळाली तर ते महत्कार्य करण्यास अधिक सक्षम होतील या विचारानं जेव्हा संधी मिळेल तेव्हा सावरकर त्यांच्याशी संवाद साधत, ऐतिहासिक कथा सांगत, त्यातून दिवसभर भोगलेल्या यातनांनी कष्टी झालेल्या बंदिवानांच्या मनाला नवी उभारी मिळत असे.

कितीही अडथळे असले तरी आपल्याशी संवाद साधण्यास सर्वच बंदिवान उत्सुक असतात हे जाणवल्यावर सावरकरांनी कारावासातच संघटना बांधणी करण्याचं निश्चित केलं. अंदमानातील प्रचार कार्याचा आरंभ म्हणून त्यांनी राजकीय बंदिवानांचं शिक्षण हाती घ्यायचं ठरवलं. संधी मिळताच लपतछपत तोंडी माहिती सांगणं, साप्ताहिक बैठकांमधून बंदिवानांचं शिक्षण सुरु झालं. मिळालेली माहिती, व्याख्या, वेचे कोठडीतील भिंतीवर लिहून ठेवल्या जाऊ लागल्या. भिंत खरवडून शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं असा आरोप ठेऊन क्वचित प्रसंगी बंदीवानांनी शिक्षाही भोगल्या. महिन्याभरात कोठडीतील भिंतीना चुना लावण्यात येत असे, त्यामुळे पाटी आपोआपच कोरी होत असे. हे फायद्याचं असलं तरी महिन्याभरात लिहिलेलं कंठस्थ करावं लागे.

पुस्तकं मिळणं ही या शिक्षणातील मोठी अडचण होती. वर्षातून एकदा घरून पत्र, साहित्य मिळत असे. त्यात सावरकर बंधू पुस्तकंच मागवत असत. तसंच त्यांनी सहबंदिवानांनाही घरून पुस्तकं मागवण्यास प्रवृत्त केलं. पण त्यांच्या घरी देखील अज्ञानाचंच राज्य असल्यामुळे घरून उंची जोडे येत, पण दोन आण्याचं पुस्तक मिळत नसे. अर्ज करून बंदिवानांच्या शिक्षणासाठी पुस्तकं ठेवण्याची सवलत मिळाली. तेव्हा एका संस्थेची स्थापना करण्यात आली आणि बंदिवानांना कामाच्या मोबदल्यातून मिळणारी काही रक्कम निधी म्हणून जमा होऊ लागली आणि सेल्युलर कारागृहात दीड दोन हजार पुस्तकांचे ग्रंथालय साकारलं. त्यातून पाट्या, पुस्तकं विकत घेता येऊ लागली तरी पुस्तक जवळ बाळगणं, एकमेकांत पुस्तक बदलणं हा गुन्हा समजला जात असल्यामुळे शिक्षेला भिऊन शिक्षण सोडणाऱ्यांचं मन वळवण्यासाठी तंबाखूच्या चिमटीचं आमिष दाखवावं लागत असे. कारागृहाबाहेर काम करणाऱ्या बंदिवानांसाठी फिरतं ग्रंथालय सुरु झालं. शिकण्याचा फायदा म्हणजे नव साक्षरांना कारकुनाचं- लिपिकाचं, लेखनाचं काम मिळू लागलं. अधिकार पदावर त्यांच्या नेमणूका होऊ लागल्या. व्यसनं, घातपात, भांडणं कमी झाली. शिक्षणातून देशप्रेम, राष्ट्रभावना जागृत होऊ लागली.

धर्मांतरास आळा आणि शुद्धीकरण

सेल्युलर कारागृहात जाताच सावरकरांना लक्षात आलेली अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदुंचं बळानं होत असलेलं धर्मांतरण. राजकीय बंदिवान हिंदूच असल्यामुळे त्यांच्यावर मुसलमान जमादार नेमले जात असत. ते हिंदू बंदिवानांना सक्तीचं काम करायला लावत, कठोर शिक्षेचा धाक दाखवत, त्यांच्यावर खटले भरून त्यांना भंडावून सोडत. यातून सुटण्यासाठी मुसलमान होण्याचा धोशा लावत. दर पंधरा दिवसांनी, महिन्याभरात एकतरी हिंदू मुसलमानांच्या पंक्तीत बसलेला आढळे. हे पाहून अस्वस्थ झालेल्या सावरकरांनी, त्यांचे बंधू बाबारावांच्या साथीनं हिंदू बंदिवानांना या धर्मांतराविरुद्ध आवाज उठवण्यास प्रेरित केलं. १९१३मध्ये एका हिंदूस बाटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुसलमानाचा प्रतिकार करण्यात आला, त्याच्यावर खटला भरण्यात आला. चोर, खुनी असलेले हिंदू मुसलमान झाले तर काय हरकत आहे असा युक्तिवाद करत हिंदूच शुद्धीकरणाला विरोध करत असत. पण चोर असो, लुच्च्या असो कुठल्याही हिंदूला परधर्मात जाऊ द्यायचे नाही कारण त्या चोरातूनचं एखादा वाल्मिकी निपजेल हा सावरकरांचा विश्वास होता. तंबाखू म्हणजे सुंता, सक्त काम हेच कुराण आणि मुसलमान जेवण हाच नमाज इतक्या सोप्या मुसलमान धर्माच्या दिक्षेविरोधात सावरकरांनी शुद्धीकरणाची तशीच सोपी पद्धती अमलात आणली. आमचा हिंदू धर्मात स्वीकार करावा ही प्रार्थना, खायला तुळशीपत्र आणि गीतेतील किंवा तुळशीदास रामायणातील अध्यायाचं वाचन केलं की परधर्मात गेलेल्याची शुद्धी होत असे. मुसलमानांनी शिवलेलं काहीही खाल्लं तरी धर्म बाटतो एकत्र खाल्लं, प्यायलं तरी विटाळ होतो अशा खुळचट कल्पनांविरोधात सावरकरांनी आवाज उठवला. शीरगणतीच्या वेळी सेल्युलर कारागृहात प्रवेश करताना बंदिवानाचा जो धर्म लिहिलेला असेल तोच त्याचा धर्म मानला जावा यासाठी सावरकरांनी केलेल्या चळवळीला यश मिळालं.

हिंदी भाषेचा पुरस्कार

एकमेकांशी संवादासाठी एक भाषा हवी या उद्देशानं सावरकरांनी अंदमानात हिंदी भाषेचा प्रसार केला त्यामुळेच हिंदी हीच अंदमानची संपर्क भाषा झाली व पुढे जाऊन आपली राजभाषा. सावरकरांनी सर्वच बंदिवानांना अन्यायाविरुद्ध लढण्यास, आपल्या हक्कांसाठी संपासारखं हत्यार उपसण्यास प्रेरित केलं आणि कारागृह प्रशासनाला नमवलं. त्याच बरोबर सावरकरांनी सर्व बंदिवानात राष्ट्रप्रेम जागवलं. जगायचं आणि लढायचं ते देशासाठी हा कानमंत्र दिला.

( लेखिका स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.