माझा करेक्ट कार्यक्रम करण्याची हिंमत अजित पवारांमध्ये नाही; बावनकुळे यांची टीका

93

मी केलेल्या बारामतीच्या एकाच दौऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांना इतकी भिती वाटली की, ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले आहेत. पण माझा करेक्ट कार्यक्रम करण्याची हिंमत अजित पवारांमध्ये नाही. त्यांनी नागपुरात येऊन अशी भाषा करू नये. मी त्यांचे कोणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी सुनावले.

आव्हान स्वीकारण्यास तयार

ते नागपूर येथे विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी केलेल्या टिप्पणीला उत्तर देताना ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले की, अजित पवारांमध्ये हिंमत आहे आणि ते लढवय्ये आहेत, असा माझा समज होता. पण माझ्या बारामतीच्या एकाच दौऱ्याचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला, त्यांना भिती वाटली आणि ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले. अजून काही दौरे होणार आहेत. त्यामुळे मी त्यांचे कोणत्याही पातळीवरील आव्हान स्वीकारण्यास तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेससोबत युती करूनही ७५ पेक्षा अधिक जागा विधानसभा निवडणुकीत जिंकता आल्या नाहीत, ते काय आमचा करेक्ट कार्यक्रम करणार? जनता कोणाचा काय कार्यक्रम करायचा ते ठरवत असते. बारामती शहर वगळता संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या वागण्याने प्रचंड नाराजी आहे. हुकुमशाहीसारखे वातावरण आहे, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.

(हेही वाचा जामिन्यावर बाहेर पडलेल्या देशमुखांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीची कार्यकारिणी आर्थर रोड बाहेर हजर )

त्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही

आठ आठ दिवस मोबाईल बंद करून भूमिगत होणारे अजितदादा आम्ही पाहिले आहेत. अजितदादांच्या तोंडी करेक्ट कार्यक्रम असे शब्द शोभत नाहीत. त्यांनी विदर्भात येऊन आव्हान देऊ नये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुम्ही बरोबरी करू शकत नाही. त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी आधी स्वतःच्या पक्षाचा विचार करा, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांना सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.