यवतमाळ येथील डॉक्टरवर चाकूने हल्ला

154
यवतमाळ येथील श्री वसंतराव नाईक सरकारी रुग्णालयात गुरुवारी सायंकाळी रुग्णाने दोन निवासी डॉक्टरांवर  चाकूने हल्ला केला. डाॅक्टर जेबेस्टीन एडविन असे हल्ला झालेल्या डाॅक्टरचे नाव आहे. जनरल सर्जरी विभागात शिकणा-या पहिल्या वर्षाच्या निवासी डॉक्टराच्या मानेला व पाठीला जखमा झाल्या आहेत. या हल्ल्यात अजून एक डॉक्टर जखमी झाला आहे. या घटनेने संतप्त डॉक्टरांनी सायंकाळपासून संप पुकारला आहे.
 
सायंकाळी सातच्या सुमारास रुग्णालयात आलेल्या एका रुग्णाने दोन निवासी डॉक्टरांवर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या डॉक्टर जेबेस्टीन एडविनवर शस्त्रक्रिया सुरु आहे. या घटनेने संतापलेल्या यवतमाळ येथील मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने घटनेचा विरोध दर्शवण्यासाठी तातडीने काम बंद केले. रुग्णालयाच्या प्रांगणात रात्री उशिरापर्यंत डॉक्टरांनी घोषणा दिल्या.
 
 
यवतमाळ येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरांनी आपत्कालीन सेवेतून माघार घेतली आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून मार्ड या निवासी संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. डॉक्टरांवर वारंवार हल्ले होत आहेत. यवतमाळमध्ये याअगोदरच्या घटनेत डॉक्टराचा मृत्यू झाला. गरज भासली तर हल्ल्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातून मार्डचे प्रतिनिधी यवतमाळमध्ये जमा होऊन संपात सहभागी होतील. सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश दहिफडे यांनी डॉक्टरांच्या सुरक्षिततेविषयी ठोस उपाययोजनांची मागणी सरकारकडे केली आहे.
 
शुक्रवारी राज्यभरातील सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टर्स काळ्या फिती लावून निदर्शने करतील. पुढील भूमिका सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर केली जाईल, असे सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश दहीफडे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.