शिंदे गटातील नेते आणि मंत्री संदीपान भुमरे यांची शस्त्रक्रिया सुरु असताना, अचानक लाईट गेल्यामुळे औरंगाबाद येथील सरकारी रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. विशेष म्हणजे लाईट गेल्यावरदेखील रुग्णालयात जनरेटरची सोय नसल्याने भुमरेंनी संताप व्यक्त केला आहे.
औरंगाबाद रुग्णालयाची पाहणी
संदीपान भुमरे रविवारी औरंगाबाद येथील सरकारी रुग्णालयाची पाहणी करण्यास गेले होते. पाहणी करताना दंत चिकित्सा विभागात पोहोचले. यावेळी विचारपूस करुन त्यांनी डाॅक्टरांना त्यांच्या दाताची तक्रार सांगितली. यावर ऑपरेशन करण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला. ऑपरेशन सुरु असताना, रुग्णालयाची लाईट गेली. तसेच, रुग्णालयात जनरेटरचीदेखील सोय नव्हती. परंतु, रुग्णालयात ऑपरेशन थेएटरमध्ये अनेक डाॅक्टर उपस्थित असल्याने फोनच्या टाॅर्चवर त्यांची शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
( हेही वाचा: ‘‘अन् माझे दुसरे बारसे ‘राज’ या नावाने झाले’’; सुबोध भावेंच्या प्रश्नावर राज ठाकरेंचे उत्तर, म्हणाले… )
जनरेटरचा प्रस्ताव तातडीने मंजूर करा
यानंतर भुमरे यांनी जनरेटर नसल्याचा जाब विचारला. याला उत्तर देत, जनरेटरची मागणी मागच्या पाच वर्षांपासून केली आहे. मात्र, त्यावर आजतागायत निर्णय झालेला नाही, असे अधिका-यांनी सांगितले. यावर तातडीने निर्णय घेत भुमरेंनी रुग्णालयातूनच जनरेटरचा प्रस्ताव तातडीने मंजुरीचे निर्देश दिले. तसेच, जोपर्यंत नवा जनरेटर पोहोचत नाही, तोपर्यंत कोविड सेंटरमधला जनरेटर सरकारी रुग्णालयात नेण्याच्या सूचना देखील भुमरे यांनी केल्या.
दरम्यान, भुमरे यांनी आधी रुट कॅनल केले आणि त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात पोहोचले होते. संदीपान भुमरे मंत्री असूनदेखील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी गेले म्हणून त्यांचे कौतुक केले जात आहे.
Join Our WhatsApp Community