प्रवासी भाडे नाकारणाऱ्या मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई वाहतूक पोलीस विभागाचे सह पोलीस आयुक्त राजवर्धन यांनी सर्व वाहतूक विभागाला दिले आहेत. तसेच प्रवाशांनी भाडे नाकारणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांची तक्रार जवळच्या वाहतूक पोलीस चौकी अथवा वाहतूक पोलिसांना द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
( हेही वाचा : अंधेरीत आमचा उमेदवार निवडून आला असता, पण..; शिंदेंनी सांगितले माघारीचे कारण )
रिक्षा टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार सर्रासपणे मुंबईत सुरू आहेत. कुर्ला पश्चिम येथे भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालक आणि तक्रार न घेणाऱ्या वाहतूक पोलिसांची दादागिरी एका वृत्तपत्राच्या पत्रकाराने मोबाईल कॅमेरात कैद करून समाजमाध्यमावर टाकल्यावर मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन वाहतूक विभागाच्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. टॅक्सी रिक्षा चालकाकडून भाडे नाकारल्याच्या अनेक तक्रारी ट्विटर या समाज माध्यामावर वाढल्या आहेत. नजीकचे भाडे नाकारणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकामुळे, वृद्ध, महिला, आजारी व्यक्तींना मनस्ताप सहन करावा लागत आहे. भाडे नाकारणाऱ्या मुजोर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वठणीवर आणण्यासाठी मुंबई वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त राजवर्धन यांनी कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाच्या प्रभारी पोलीस निरीक्षकांना दिले आहेत.
तसेच टॅक्सी, रिक्षाचालक आणि त्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना याबाबत समज देण्यात यावी असेही आदेशात म्हटले आहे. भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी, रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येईल असे फलक रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा, टॅक्सी स्टँड, तसेच बस स्थानकाच्या बाहेर दर्शनी भागात लावण्यात यावे व भाडे नाकरणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकाविरुद्ध तक्रारी प्राप्त होताच तात्काळ कारवाई करावी असेही आदेशात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community