ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार

127

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षाचालकांची अरेरावी, अनधिकृत फेरीवाले आणि वाहतूक नियोजनाचा अभाव यातून भेडसावणारी वाहतूक कोंडी दूर होण्याची चिन्हे आहेत. आमदार संजय केळकर यांनी वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिका-यांची संयुक्त बैठक घेऊन काही पर्याय आणि सूचना दिल्या.

भारतातील पहिली रेल्वे धावलेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानाकातील वाहतूक कोंडी ही गंभीर रूप धारण करू लागली असून या परिसरातच राहणाऱ्या रहिवाशाला घरी पोहोचण्यास अर्धा तास लागतो. तर स्थानकातून ठाण्यातील अन्य भागात पोहोचताना नागरिकांची चांगलीच दमछाक होते. स्थानक परिसरात रिक्षा चालकांची अरेरावी, वाहतूक नियोजनाचा अभाव आणि अनधिकृत फेरीवाल्यांची मुजोरी यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी संयुक्त बैठकीत पत्रकारांना दिली.

रिक्षा परवान्यांवर नियंत्रणाची गरज 

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केळकर यांनी सूचना करत वाहतुकीबाबत काही पर्यायही सांगितले आहेत. स्टेशन परिसरात रिक्षा संघटनेच्या कार्यालयाच्या जागी वाहतूक पोलीस चौकी २४ तास सक्रिय असावी, अशी आग्रही भूमिका केळकर यांनी घेतली. स्थानक परिसरातून गोखले मार्गाकडे आणि शिवाजी पथकडे वाहतूक सुरळीत होण्यासाठी योग्य नियोजनाची गरज असून लवकरच या परिसराची आरटीओ, वाहतूक पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांना घेऊन रेकी करण्यात येईल, असे केळकर यांनी सांगितले. रस्ते अडवणाऱ्या फेरीवाल्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची गरज असून रिक्षाचालकांनाही शिस्तीचे धडे देण्याचा आग्रह केळकर यांनी अधिकाऱ्यांकडे धरला. एकीकडे लोकसंख्या वाढत आहे तर वाहनतळांचीही कमतरता भासत आहे, असे असताना रिक्षांना परवाने मोठ्या प्रमाणात दिले जात आहेत. या परवान्यांवर नियंत्रण आणण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

( हेही वाचा: “श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद सांगितला”; माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य )

पालिकेमुळे ठाणेकरांची कोंडी 

गेल्या पाच वर्षांपासून मी मॉडेला येथील ट्रक टर्मिनसबाबत पाठपुरावा करत आहे, मात्र ठाणे महापालिकेच्या दिरंगाईमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला. परिणामी ठाण्यात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांमुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीला दररोज सामोरे जावे लागत आहे. पालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ही समस्या आणखी गंभीर होऊ लागल्याचा आरोप  केळकर यांनी केला. बैठकीस आरटीओचे अधिकारी नलावडे, वाहतूक पोलीस सहाय्यक आयुक्त वे वेरणेकर, पोलीस निरीक्षक पांढरे व स्थानक परिसरातील माजी नगरसेवक संजय वाघुले, सुनेश जोशी, प्रवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.