पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. दिवाळीच्या निमित्तानेही दोन्ही गट आमनेसामने आले असून, दोहोंत ‘कंदील युद्ध’ रंगल्याचे चित्र मुंबईतील गल्लोगल्ली पहायला मिळत आहे.
( हेही वाचा : छठ पूजेसाठी मुंबईत कृत्रिम तलाव तयार करा; बाळासाहेबांच्या शिवसेनेची मागणी)
अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले. तसेच शिवसेना हे एकल नाव वापरण्यास बंदी घातली. त्यानंतर ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह, तर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव देण्यात आले. दुसरीकडे शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह, तर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव देण्यात आले.
भाजपाने अंधेरी पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घेतल्याने उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झाला असला, तरी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रणनीती आखली आहे.
त्यासाठी दिवाळी सणाचा पुरेपूर वापर करून घेतला जाणार असून, उटण्याची पाकिटे, पणत्या आणि घरोघरी वाटल्या जाणाऱ्या अन्य भेटवस्तूंवर मशाल हे चिन्ह छापण्याची सूचना करण्यात आली आहे. विशेषतः आकाशकंदीलांवर धगधगती मशाल ठळकपणे दर्शवून, नवे निवडणूक चिन्ह तळागाळात पोहोचवण्याची योजना आहे.
शिंदे गटाचे जशासतसे उत्तर
उद्धव ठाकरे गटाने मुंबईतील गल्लोगल्ली आकाशकंदील लावून मशाल चिन्हाचा प्रचार सुरू केला असताना, शिंदे गट तरी कसा मागे राहील? शिंदेंच्या कार्यकर्त्यांनीही ‘ढाल तलवार’ घरोघरी पोहोचवण्यासाठी आकाशकंदीलांचा आधार घेतला आहे. ठाकरे गटाच्या कंदीलांवर बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. तर शिंदे गटाच्या कंदिलांवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. मुंबई शहर, उपनगरातील महत्त्वाचे चौक, रस्ते, सार्वजनिक ठिकाणांवर लागलेले हे मोठमोठे कंदील लक्षवेधक ठरत आहेत.
Join Our WhatsApp Community