राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह असून आज पाच दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे. दरम्यान, पुण्यात गणेशोत्सवामुळे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केल्याचा मोठा फटका प्रवाशांसह पीएमपीला बसत आहे. पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केल्याने शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता व टिळक रस्त्यावरून पीएमपी बस सेवा बंद केल्याने साधारण २५० फेऱ्या रद्द झाल्या आहेत. याचा फटका सव्वा दोन लाख पुण्यातील प्रवाशांना बसल्याचे समोर आले आहे.
पीएमपी बस सेवा बंद केल्याने पीएमपीचे एका दिवसाचे सुमारे २० ते २२ लाखांचे उत्पन्न बुडत आहे. रस्ते बंद आणि ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याने कॅबचे बुकिंग ऐनवेळी रद्द केले जात असल्याने त्याचा फटका कॅब सेवेवर देखील होत आहे. वाहतूक मार्गात बदल केल्याने प्रवाशांना बस उपलब्ध होत नसून कॅबची देखील व्यवस्था होत नसल्याने त्यांची फरफट होत आहे.
(हेही वाचा – …नाहीतर आता वाहतूक पोलिसांवरच होणार कारवाई!)
गणेशोत्सवादरम्यान, देखावे पाहण्यासाठी पुण्यात नागरिकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे वाहतूक पोलीस दुपारपासूनच रस्ते बंद करण्यास सुरूवात करतात. नागरिक विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी पेठांमध्ये किंवा तुळशीबाग सारख्या ठिकाणी येतात. काही जण तर केवळ दगडूशेठसह मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून पुण्यात येत असतात. त्यामुळे अशा नागरिकांची खूप गैरसोय होत आहे.
Join Our WhatsApp Community