दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचा मान कोणाला?

86

शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा होणार, यावरून आता पैजा लावल्या जात आहेत. आजवर शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होत आला आहे आणि दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. पण यंदा मात्र शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचा मान कोणाला मिळणार यावरून तर्क-वितर्क लावले जात आहेत. दसरा मेळाव्याचे आयोजन करण्याची परवानगी मिळावी म्हणून शिवसेनेने महापालिकेच्या जी-उत्तर विभागाला २२ ऑगस्ट २०२२ रोजी आपला अर्ज सादर केला. मात्र, आपल्याला महापालिका परवानगी देत नसल्याचा कांगावा आता शिवसेनेकडून केला जात आहे. राज्यात एकनाथ शिंदे गटाने भाजप सोबत युतीचे सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा एक मोठा गट बाजूला करत वेगळ्या शिवसेनेची स्थापना केली आहे. मूळ शिवसेना आपलीच असल्याचा दावा एकनाथ शिंदे करत असतानाच शिवसेनेने मात्र आपल्याला दसरा मेळाव्यासाठी परवानगी न देण्यामागे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर सरकारचा दबाव असल्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आरोप करण्यास सुरुवात केली आहे. मुळात ज्या शिवसेनेची मुंबई महापालिकेत २५ ते ३० वर्षे सत्ता होती, त्या शिवसेनेला आपल्याच महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळत नाही, किंबहुना परवानगी न मिळण्यामागची अडचण काय हे कळत नाही. हे शिवसेनेचे सर्वात मोठे अपयश असल्याचे दिसून येते. म्हणजे प्रशासनावर शिवसेनेची पकड नव्हतीच हेही सिद्ध होते. ज्याअर्थी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपला ‘बाळासाहेब शिवसेना गट’च मूळ शिवसेना असल्याचा दावा करत आहेत त्याअर्थी दसरा मेळाव्याची जी परंपरा आहे, त्यावर शिंदे गटाने दावा करत दसरा मेळावा शिवतीर्थावर व्हावा यासाठी आग्रह का धरू नये?

दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी गणपतीत परवानगी

उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असले तरीही मूळ शिवसेनेचा वाद हा न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हे न्यायालयातच सिद्ध होईल. पण दसरा मेळाव्याचा मान उद्धव ठाकरे मिळवण्यात यशस्वी होतात की शिंदे हा मान आपल्याकडे घेतात हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. परंतु या निमित्ताने एक गोष्ट सांगावीशी वाटते की एरवी नवरात्रोत्सव सुरू झाल्यानंतर दसरा मेळाव्यासाठी परवानगी अर्ज करणाऱ्या शिवसेनेकडून यंदा ऑगस्ट महिन्यातच अर्ज का करण्यात आला. याचाच अर्थ कुठेतरी उद्धव ठाकरे यांना आपल्या शिवतीर्थावर दसरा मेळाव्याकरता परवानगी मिळणार नाही याची कुणकुण लागली असावी. हे जरी सत्य असले तरीही महापालिकेच्या कार्यपद्धतीनुसार ज्या पक्षाकडून परवानगीसाठी पहिला अर्ज प्राप्त होतो, त्या पक्षाला परवानगी देणे हे महापालिकेचे पहिले कर्तव्य आहे. इथे कुणाचा दबाव आणि कुणाचा हस्तक्षेप आहे हे ग्राह्य धरले जाऊ शकत नाही. त्यामुळे ऑगस्टमध्ये अर्ज करून शिवसेनेने आपल्यालाच परवानगी कशी मिळेल याची पूर्णपणे तरतूद करून ठेवलेली आहे. भलेही उद्या सरकारकडून दबाव आला तरीही त्यांना परवानगी नाकारताना मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ठोस कारण द्यावे लागेल.अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांना परवानगी नाकारण्याचे अधिकार महापालिका प्रशासनाला आहेत.

(हेही वाचा अवघ्या १०-१५ दिवसांत खेतवाडीतील १५-२० फुटांच्या गणेशमूर्ती कशा उभ्या केल्या?)

मुंबई महापालिका दोघांनाही परवानगी नाकारु शकते

शिवसेना आणि शिंदे गट यांचा दसरा मेळाव्यावर जो काही हक्क सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच मनसेने सुद्धा उडी मारलेली आहे, हे विसरून चालणार नाही. भविष्यामध्ये शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात शिवसेना कुणाची यावरून सुरू असलेल्या न्यायालयीन बाबीचा विचार करता मुंबई महापालिका या दोघांनाही परवानगी नाकारु शकते. अशावेळी मनसेने जर शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आणि तशा प्रकारचा अर्ज जर त्यांच्या पक्षाच्यावतीने महापालिका प्रशासनाला सादर केला, तर अशा परिस्थितीमध्ये मनसेला मुंबई महापालिका प्रशासन परवानगी देऊ शकते. तसे झाल्यास मनसेच्या पुढील वाटचालीच्या दृष्टिकोनातून दसरा मेळाव्याची परंपरा ही मनसेकडे जाऊ शकते. शिवसेनेच्या स्थापनेपासून सन २०१२ पर्यंत बाळासाहेबांनी एकच नेता एकच मैदान गाजवत शिवतीर्थावर अनोखा विक्रम रचला आहे. अपवाद फक्त एका वर्षी निवडणूक आचारसंहितेमुळे न झालेला मेळावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे वारसदार म्हणून पाहिले जाते. राज ठाकरे यांच्यामध्ये आजही महाराष्ट्रातील जनता बाळासाहेबांना पाहत आली आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी सुरु केलेल्या दसरा मेळाव्यात अन्य कुणाच्या विचारांचे सोने लुटण्याऐवजी राज ठाकरे यांच्या मनसेच्या दसरा मेळाव्याला याठिकाणाहून सुरुवात व्हावी, अशीच इच्छा राज्यातील जनतेची असेल. बाळासाहेबांकडून मिळालेल्या बाळकडूमुळेच आज बोलण्यापासून ते चालण्यापर्यंत अगदी हुबेहुब वाटणाऱ्या राज ठाकरे यांच्याकडून विचारांची पेरणी अचूक होऊ शकते. त्यामुळे जर मूळ शिवसेनेचा वाद न्यायप्रविष्ट असेल तर अशा परिस्थितीत मनसेने आपला दसरा मेळावा शिवतीर्थावर घेऊन नव्या राजकीय पर्वाची सुरुवात करावी,असे म्हणता येईल.

दसरा मेळाव्याचा मान मनसेच्या पदरात पडणार?

प्रबोधनकार केशव ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अशा ठाकरे कुटुंबातील ४ पिढ्यांसाठी दादरमधील हे छत्रपती शिवाजी महाराज पार्क अर्थात शिवाजी पार्क आणि आचार्य अत्रे यांनी नामकरण केलेले शिवतीर्थ हे महत्त्वाचे ठरलेले आहे. त्यामुळे या मैदानावर मनसेचा दसरा मेळावा झाल्यास हे मैदान ठाकरे कुटंबाकडेच राहील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर सभेमध्ये वारसा हा वास्तूचा नसतो, विचारांचा असतो, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे विचारांचा वारसा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिला नसून तो आजही राज ठाकरे यांच्याकडे असल्याने दसरा मेळाव्याचा मान मनसेच्या पदरात पडायला काहीच हरकत नसावी. उद्धव ठाकरे यांनी महापालिकेतील सत्ता मजबूत करण्यासाठी मनसेचे सहा नगरसेवक फोडले. परंतु आज शिवसेनेला फोडाफोडीने इतकं त्रस्त केलंय की धड त्यांना जागेवरही बसता येत नाही. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्या प्रकारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटी देत आहेत, ते पाहता मनसेला दसरा मेळाव्याला ते परवानगी देणार नाही, असे होणार नाही.

(हेही वाचा Cyrus Mistry Death : टाटा समूहाच्या सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.