मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव असलेल्या उद्यानाचा उद्घाटन कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. विविध स्वयंसेवी संघटनांनी उद्यानाच्या या नावावर आक्षेप घेतला होता. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या उद्घाटन कार्यक्रमासाठी हजेरी लावणार होते. मात्र हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केल्यामुळे हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोव-यात सापडला होता. हडपसर परिसरात महापालिकेच्या जागेवर हे उद्यान उभारण्यात आले आहे. शिवसेनेचे शिंदे समर्थक माजी नगरसेवर प्रमोद नाना भानगिरे यांनी या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र संघटनांच्या आक्षेपानंतर अखेर हा उद्घाटन कार्यक्रमच रद्द करण्यात आला आहे.
( हेही वाचा: औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे प्रकरण? )
हाडपसर परिसरातील ही उद्यानाची जागा महापालिकेची आहे. मात्र उद्यान उभारणी आणि विकासासाठीचा खर्च आपण स्वत: केल्याचा दावा भानगिरे यांनी केला आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील रहिवासी आणि महापालिका आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उद्यानाला शिंदे यांचे नाव देण्यास सहमती दर्शवण्यात आली होती, असेही त्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी या नामकरणाला प्रशासकीय मान्यता नाही. त्यामुळे मंगळवारी होणारा उद्घाटन सोहळा वादात सापडला.