मुंबईच्या ४०० किलोमीटर रस्त्यांचे होणार सिमेंटीकरण; तब्बल ५८०० कोटी रुपये केले जाणार खर्च

98

मुंबईतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डयांमुळे आता तब्बल ४०० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात येणार असून या रस्त्यांच्या सुधारणासाठी एकूण ५ हजार ८०० कोटी रुपयांच्य अंदाजित खर्चाच्या निविदा महापालिकेच्यावतीने मागवण्यात आल्या आहेत. पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्याच्यादृष्टीने प्रशासनाचे मोठे पाऊल उचलले आहे. या रस्त्यांच्या बांधकामांमध्ये उपयोगिता सेवा वाहिन्या अर्थात युटीलिटीसाठी स्वतंत्र भूमिगत मार्ग, पावसाचे पाणी मुरण्यासाठी शोषखड्डे, गुणवत्ता नियंत्रणासाठी संस्थेची नेमणूक आणि सीसीटीव्ही कॅमेरे आदी तरतुदींचा निविदांमध्ये समावेश आहे. या निविदेमध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महामार्ग बांधणीचा अनुभव असलेल्या नामांकित कंपन्यांकडून प्रतिसाद मिळेल असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.

( हेही वाचा : सुमारे २ लाख तिरंगा ध्वज महापालिकेला झाले प्राप्त )

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते सुधारणा कामांचा एकत्रित आढावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २३ जुलै २०२२ रोजी घेतला होता. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी मुख्यमंत्री महोदयांसमोर सविस्तर सादरीकरण केले होते. मुंबईत टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते बांधणी केली जात आहे. महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत सुमारे ९८९.८४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्ते देखील सुधारण्याच्या दृष्टीने सिमेंट काँक्रिटीकरणाला वेग देण्यात आला आहे. सिमेंट काँक्रिट रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून पर्यायाने परीरक्षणाचा खर्च देखील कमी होतो. यंदा अर्थातच सन २०२२-२०२३ मध्ये २३६.५८ लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम होत आहे. त्यासाठी २ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च होत आहे. तर आणखी तब्बल ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम याच वर्षी प्रस्तावित आहे, तर उर्वरित आणखी ४२३ किलोमीटर लांबीची कामे पुढील वर्षी कामे हाती घेतली जाईल, अशी माहिती या बैठकीत आयुक्त महोदयांनी दिली होती.

त्यानुसार, सुमारे ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी एकूण पाच निविदा निमंत्रित करण्यात आल्या आहेत. या पाच निविदांमध्ये समाविष्ट असलेल्या कामांसाठी एकूण अंदाजित ५ हजार ८०६ कोटी रुपये खर्च होणार आहे.

या निविदांचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व ४०० किलोमीटर लांबीच्या रस्ते कामांसाठी एकत्रितपणे निविदा मागवल्या आहेत. त्याचप्रमाणे, या निविदा प्रक्रियेमध्ये संयुक्त भागीदारी उपक्रमास परवानगी नाकारण्यात आली आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महामार्गांची कामे करणाऱ्या मोठ्या आणि नामांकित कंपन्या या निविदा प्रक्रियेत सहभागी होतील, अशी महानगरपालिका प्रशासनाला अपेक्षा आहे.

निविदा कशाप्रकारे मागवली आहे ते वाचा …

  • मुंबई शहर विभाग(१ निविदा): सुमारे ७१ किलोमीटर रस्ते, सुमारे १ हजार १९४ कोटी रुपये
  • पूर्व उपनगरे विभाग ( १ निविदा) सुमारे ७० किलोमीटर रस्ते , सुमारे८११ कोटी रुपये
  • पश्चिम उपनगरे (तीनही परिमंडळांसाठी स्वतंत्र) एकूण २७५ किलोमीटर रस्ते, सुमारे ३ हजार ८०१ कोटी रुपये

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.