Dahi Handi 2022 : गोविंदांसाठी ‘मनसे’चं चिलखत, तर ‘भाजप’चं सुरक्षा कवच!

148

गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोना महामारीमुळे दहीहंडीसह इतर सणांवर देखील निर्बंध घालण्यात आले होते. मात्र यंदा सर्व सण निर्बंधमुक्त साजरे करता येणार आहे. विशेष म्हणजे मुंबईत उत्साहात दहीहंडी साजरी करण्यात येते. तसेच गोविंदा पथकांमध्येही तितकाच उत्साह असतो. असे असले तरी गोविंदांच्या सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत असते. दहीहंडीदरम्यान, काही वेळा दुर्घटनांमध्ये कित्येक गोविंदा जखमी किंवा मृत्यूमुखी पडतात. यानंतर त्यांच्या कुटुंबाची अवस्था बिकट होते. या पार्श्वभूमीवर यंदा गोविंदाना विमा सुरक्षा कवच देण्यासाठी मनसे आणि भाजप पुढे सरसावले आहे.

अवघ्या काही दिवसांवर दहीहंडी हा सण आल्याने त्याचा सराव सर्व ठिकाणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईतील अपघातग्रस्त होणाऱ्या गोविंदाना मनसेकडून सुरक्षा कवच देण्यात येणार तर या योजनेअंतर्गत दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचणाऱ्या 1 हजार गोविंदांचा 100 कोटींचा मोफत विमा काढण्यात येणार आहे. दहीहंडी फोडताना अनेक गोविंदा जखमी होतात तर मृत्यूमुखीही पडतात. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना मदत मिळावी यासाठी मनसेने गोविंदासाठी विमा सुरक्षा कवच योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या विम्याची मुदत 19 ऑगस्टचा पूर्ण दिवस असणार आहे.

(हेही वाचा – गोविंदा पथकांचा ‘विमा’ महापालिकांनी उतरवावा; ‘मनसे’ची मागणी)

मनसेकडून देण्यात येणाऱ्या या ‘सुरक्षा कवच’ योजनेचा लाभ घेण्यासाठी गोविंदा पथकांनी मंडळाच्या लेटरहेडवर गोविंदांची वयासह नावे नोंदवून मनसे मध्यवर्ती कार्यालय, सीवूड्स येथे जमा करावीत, असे आवाहन मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या गोविंदांना किंवा पथकांना कोणताही खर्च करावा लागणार नाही, असेही गजानन काळे यांनी सांगितले आहे.

यासह भाजप देखील गोविंदा पथकांच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे दिसतेय. भाजपकडून देखील गोविंदांसाठी 10 लाखांचे विमा कवच देण्यात आले आहे. दरवर्षी दहिहंडीमध्ये आपले अवयव गमावतात. त्यांची काळजी आपणच केली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून गोविंदांसाठी 10 लाखांचा वीमा देण्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आले आहे. गोविंदांनी यात सहभाग घ्यावा. आता भिती नाही कशाची भाजप तुमच्या पाठिशी असे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.