सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग भागात ९ जणांना माकडतापाची बाधा झाली आहे. दोडामार्ग येथील ४ गावांमध्ये माकडतापाचे ९ रुग्ण आढळले आहेत. दोडामार्ग भागात माकड मृत्यू पावल्यास योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या सूचनाही वनविभागाला देण्यात आल्या आहेत. २०१७ सालापासून माकडतापाचा आजार दोडामार्ग परिसरात आढळून येत आहे. २०२० नंतर पहिल्यांदाच माकडतापाचे रुग्ण दोडामार्ग येथे आढळले आहेत.
काय आहे माकडताप?
क्यासनूर फॉरेस्ट डिसिज या आजाराला माकडताप असे संबोधले जाते. हा एक विषाणूजन्य आजार आहे. १९५७ साली हा आजार पहिल्यांदा कर्नाटक राज्यात शिमेगा जिल्ह्यातील क्यासनुर या गावात आढळला. या आजाराचा विषाणू मुख्यत्वे माकडाच्या शरीरामध्ये आढळतो. माकडाशिवाय उंदीर, घुशी, पक्षी, गाई गुरांच्या शरीरातही हा विषाणू वाढतो. माकडताप विषाणूचा संसर्ग झालेल्या एका विशिष्ट किटक चावल्यामुळे हा आजार माणसाला होतो. महाराष्ट्रात सिंधुदुर्गात माकडताप हा आजार २०१६ साली सर्वात पहिल्यांदा आढळला. सध्या हा आजार कर्नाटक, गोवा, केरळ आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आढळून आला आहे.
माकडतापाची लक्षणे
ताप, डोकेदुखी, अंगदुखी, डोळे येणे, थकवा, भूक मंदावणे
उपाययोजना
आरोग्य कर्मचा-यांमार्फत घरोघरी जाऊन तापाच्या रुग्णांचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना आरोग्य कर्मचा-यांना देण्यात आल्या आहेत. माकडताप बाधित भागांत किटकांना पकडून त्यांची रवानगी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे करण्यात आली आहे. तापाच्या रुग्णांकडे प्राध्यान्याने लक्ष देत उपचारांना तातडीने सुरुवात करण्याच्या सूचना आरोग्य कर्मचा-यांना दिल्या आहेत. बाधित भागांत माकडाचा मृत्यू झाल्यास त्यापासून संसर्ग फैलावू नये, याकरिता माकड मृत्यू झालेले ठिकाण हॉटस्पॉट म्हणून ५० मीटर भागांत वनविभागाकडून मॅलेथिओन पावडरची फवारणी करण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून माणसांना किटकांच्या चाव्यांपासून बचावासाठी डीएमपी तेलाचेही वाटप करण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जनावरांच्या गोठ्यांमध्ये फवारणी, किटक प्रतिबंधासाठी जनावरांना आय़व्हरमेक्टीन इंजेक्शन देणे सुरु आहे.
माकडताप बाधित भागांत काय काळजी घ्याल
- जंगलात जाताना अंगभर कपडे घाला
- जंगलातून आल्यानंतर गरम पाण्याने हातपाय धुवा. कपडे गरम पाण्यात भिजवा
- किटकांपासून वैयक्तिक संरक्षणासाठी डीमपी तेलाचा वापर करावा
- गाई-गुरे जंगलात चरायला घेऊन जाऊ नका
- गाई-गुरे यांना आठवड्यातून एकदा आंघोळ घाला
- घराबाहेर जमिनीवर झोपू नका