भाजप-शिवसेना युती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला तब्बल ४० दिवसांनी मुहूर्त मिळाला. त्यात अनेक नव्या-जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असली, तरी एकट्या संभाजीनगर जिल्ह्याच्या वाट्याला तीन कॅबिनेट मंत्रीपदे आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी शिंदे-फडणवीसांनी आखलेली ही रणनीती आहे का, अशाही चर्चा यानिमित्ताने सुरू झाल्या आहेत.
संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, मराठवाड्यातील बहुतांश आमदार शिंदे गटात सामील झाल्याने आधीच या बालेकिल्ल्याचा बुरुज ढासळायला सुरुवात झाली. त्यात आता शिंदे गटाकडून दोन आणि भाजपकडून एक असे तीन कॅबिनेट मंत्र्यांचे बळ मिळाल्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेसह नगरपरिषद आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांवर युतीचा भगवा फडकवण्याचा मार्ग सोपा झाला आहे.
भुमरे, सत्तार आणि सावे यांना संधी
शिंदे गटाकडून पैठणचे आमदार संदिपान भुमरे आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना संधी देण्यात आली आहे. तर भाजपकडून संभाजीनगर पूर्वचे आमदार अतुल सावे यांची कॅबिनेटपदी वर्णी लागली आहे. त्याखालोखाल जळगाव जिल्ह्याला गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्या रूपाने दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत.
मंत्रिमंडळाची यादी
शिवसेना
१) गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण
२) दादा भुसे – मालेगाव बाह्य (नाशिक)
३) संजय राठोड – यवतमाळ दिग्रस
४) संदिपान भुमरे – पैठण (संभाजीनगर)
५) उदय सामंत – रत्नागिरी
६) तानाजी सावंत – पलांडा (उस्मानाबाद)
७) अब्दुल सत्तार – सिल्लोड (संभाजीनगर)
८) दीपक केसरकर – सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
९) शंभूराजे देसाई – पाटण (सातारा)
भाजप –
१) राधाकृष्ण विखे पाटील – शिर्डी (अहमदनगर)
२) सुधीर मुनगंटीवार – बल्लारपूर (चंद्रपूर)
३) चंद्रकांत पाटील – कोथरूड (पुणे)
४) डॉ. विजयकुमार गवित – नंदुरबार
५) गिरीश महाजन – जामनेर (जळगाव)
६) सुरेश खाडे – मिरज (सांगली)
७) रवींद्र चव्हाण – डोंबिवली
८) अतुल सावे – संभाजीनगर पूर्व
९) मंगलप्रभात लोढा – मलबार हिल