मुंबईतील भाजप आमदार राजहंस सिंह यांच्या पर्सनल असिस्टंटचे फेसबुक अकाऊंट हॅक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर फेसबुकवरुन एक आक्षेपार्ह पोस्टदेखील टाकण्यात आली. या फेसबुक पोस्टचा स्क्रिनशाॅटही व्हायरल करण्यात आला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, आमदाराच्या पर्सनल असिस्टंटने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी एफआयआर दाखल करुन घेतला आहे. सध्या पुढील तपास केला जात आहे.
विशेष म्हणजे या आक्षेपार्ह पोस्टसंदर्भात आमदाराने पीएकडे विचारणा केल्यावर, हे सर्व प्रकरण उजेडात आले. राजकीय नेत्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी त्याच्या पीएच्या फेसबुक अकाऊंट हॅक करुन करण्यामागचे नेमके कारण काय? यावरुन आता चर्चांना उधाण आले आहे.
( हेही वाचा: ‘काश्मीर’ मध्ये पहिले मल्टिप्लेक्स थिएटर; पुढच्या महिन्यात होणार सुरु )
नेमकं प्रकरण काय?
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आमदार राजहंस सिंह यांच्या पीएने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कुरार पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या एफआयआरवरुन आता पोलिसांनी पुढील तपास करण्यास सुरुवात केली आहे. एका अनोळखी माणसाने आपले फेसबुक अकाऊंट हॅक करुन आमदारांबाबत आक्षेपार्ह टिप्पण्णी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. राजहंस सिंह यांच्या पीएचे नावे दिनेश दहिवळकर आहे. त्यांनी पोलिसांत तक्रार देताना सांगितले की, 14 ऑगस्ट रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास माझ्या फेसबुक अकाऊंटवरुन आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली. आपलं अकाऊंट हॅक करुन ही पोस्ट करण्यात आल्याचा आरोप दहिवळकर यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community