स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकून अनेकांच्या पोटात दुखायला लागलं आहे. नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवर टीका केली. मोदींनी “काका-पुतण्या आणि कौटुंबिक राजकारणाच्या मानसिकतेविरोधात लढा देण्याची गरज आहे” असं म्हटलं. तसेच “घराणेशाहीच्या आणि काका-पुतण्याच्या राजकारणामुळे देशाचं नुकसान होत आहे. घराणेशाहीच्या राजकारणामुळे कुटुंबांना पोसलं जात आहे.” असंही ते म्हणाले.
( हेही वाचा : प्रसारमाध्यमांच्या ‘न्यूड’ बातम्या, लोकशाहीचा चौथा स्तंभ घसरलाय)
याबाबत भाष्य करताना अजित पवार यांनी म्हटलं की, “घराणेशाही कोणीही आणू शकत नाही. जनतेने त्या लोकांना निवडून दिलं तर लोकशाहीत ते निवडून जाऊ शकतात. घराणेशाही संपवली पाहिजे, असं बोललं जातं. पण जनतेने निवडून दिलं तरच घराण्यातील लोक निवडून येतात.” अजित पवारांना हे वाक्य मनाला लागलं कारण मोदींनी काका-पुतण्या असा उल्लेख केला. आता हा उल्लेख नेमका कोणाबाबत केला हे मोदीच सांगू शकतात.
परंतु अजित पवारांनी यावर प्रतिक्रिया द्यायची टाळली असती तरी चाललं असतं. कारण शरद पवार हे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत. पुढे अजित पवार, सुप्रिया सुळे किंवा पवार घराण्यातीलच कुणी व्यक्ती अध्यक्ष होणार यात दुमत नाही. अजित पवारांनी मुद्दा फिरवला आहे. जे जनतेतून निवडून येतात, त्यांच्याबद्दल मोदींनी वक्तव्य केलेलं नाही. एखाद्या पक्षावर एकाच कुटंबाची सत्ता असते यावर मोदींनी भाष्य केलं आहे.
शिवसेनेवर ठाकरेंची सत्ता, राष्ट्रवादीवर पवारांची सत्ता आणि कॉंग्रेसवर गांधी घराण्याची सत्ता. आता शिंदेंच्या उठावामुळे ठाकरेंची सत्ता राहिल की नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पण राष्ट्रवादीवर पवारांचीच सत्ता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचं राजकारण पवार कुटुंबाभोवतीच का फिरत आहे? भारतीय जनता पक्षात ज्याप्रमाणे वेगवेगळा अध्यक्ष होतो, ती परंपरा राष्ट्रवादीत का नाही? हा कुटुंबवाद नाही का?
राष्ट्रवादीमध्ये घराणेशाही आहे आणि काका-पुतण्याची जोडी देखील आहे. म्हणून नरेंद्र मोदींचं वाक्य अजित पवारांच्या मनाला खूप लागलं असावं. मागे एकदा अजित पवार फडणवीसांसोबत सरकार स्थापन करुन उपमुख्यमंत्री झाले होते. कदाचित त्यांच्या मनातही घराणेशाही संपवण्याचा विचार असावा. नाही का?
Join Our WhatsApp Community