दहिहंडीसाठी वाहतुकीत बदल, असा असणार पर्यायी मार्ग

91

दहीहंडीची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या ठाणे नगरीत दरवर्षी दहीहंडी हा सण उत्साहात साजरा केला जातो. ठाण्यात केवळ दहीहंडी पथकांची गर्दी नव्हे तर दर्दी रसिक नागरिकांची देखील तितकीच गर्दी दिसून येते. ठाण्यातील टेंभी नाका येथे होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी ठाण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल केल्याची अधिसूचना वाहतूक नियंत्रण शाखेने काढली आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सव साजरा होत असताना त्यावेळी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी केले आहे.

(हेही वाचा – ढाक्कुमाकुम..! ‘मनसे’कडून ‘त्या’ गोविंदा पथकांना मिळणार ‘स्पेन’ वारी)

कधी असणार प्रवेश बंद

मुख्य पोस्ट कार्यालयाकडून (जीपीओ) कोर्टनाका मार्गे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जीपीओ येथे १९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत प्रवेश बंद राहणार आहे. त्याऐवजी ठाणे मध्यवर्ती कारागृहाकडून क्रीक नाकामार्गे दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथून उजवीकडे वळण घेऊन एवन फर्निचर मार्गे ही वाहने जातील. त्याचबरोबर कळवा आणि साकेत मार्गे ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना उर्जिता हॉटेल येथे प्रवेश बंद राहील. त्याऐवजी क्रीक नाका मार्गे डावीकडे वळण घेऊन दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलकडून उजवीकडे वळण घेऊन एवन फर्निचर मार्गे ही वाहने जातील.

(हेही वाचा – गोविंदा आलाऽरेऽऽ… मुंबईत ३७० ठिकाणी ‘भाजपा’च्या हंड्या!)

यासह ठाणे रेल्वे स्थानकापासून टॉवर नाका, टेंभी नाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी सॅटिस ब्रिज मार्गे येणाऱ्या परिवहनच्या बसेस गोखले रोड मार्गे जातील. तर रिक्षा आणि चार चाकी वाहनांना सॅटिस ब्रिज खालून स्टेशन रोड मूस चौक मार्गे डावीकडे वळण घेऊन जाण्याचे आवाहन वाहन चालकांना पोलिसांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.