प्रशासकीय दिरंगाईचा फटका; नमामि चंद्रभागा प्रकल्प आराखड्याचा मुहूर्त पुन्हा चुकला

90

पुण्यातील भीमा नदीच्या जलप्रदूषणावर मात करण्यासाठी पाच गावांमध्ये मलजल प्रक्रिया केंद्राचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यातील तांत्रिक दुरूस्तीला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. प्रकल्प आराखडा बनवणा-या व्हिजन अर्थ केअर या कंपनीसह विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय समितीच्या बेजबाबदरपणामुळे हा विलंब झाला आहे. आता पाचपैकी फक्त तीन गावांचा प्रकल्प आराखडा तयार करायचा, असा विचार पुणे जिल्हा परिषद करत आहे.

व्हिजन अर्थ केअर कंपनीचे स्पष्टीकरण

प्रकल्प आराखड्यात असंख्य चूका असल्याने त्याला मंजुरी देणे शक्य नाही, असा शेरा विभागीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अजिंक्य रहाणे यांनी प्रकल्प आराखड्यातील ११ तांत्रिक त्रुटी गेल्या वर्षी २०२१ साली नोंदवल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ यांनी ६७ तांत्रिक त्रुटी नोंदवल्या आहेत. मात्र यापैकी केवळ एकच तांत्रिक त्रुट योग्य असून, इतरत्र तांत्रिक चुका या केवळ अक्षरांची योग्य ओळख होत नाही, अशा पद्धतींची असल्याची माहिती व्हिजन अर्थ केअर कंपनीच्या प्रतिनिधीने दिली आहे.

(हेही वाचा – दहीहंडीला खेळाचा दर्जा! पुढील वर्षापासून ‘प्रो गोविंदा’ स्पर्धा; मुख्यमंत्र्यांची घोषणा)

अजूनही मलजल प्रक्रिया केंद्रांची जागा निवडण्याची योग्य पद्धत राबवली जात नाही. हा प्रकल्प आराखडा व्हिजन अर्थ कंपनीने योग्यरित्या बनवला नाही, अशी भूमिका जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी मांडली आहे. बुधवारी व्हिजन अर्थ केअर कंपनीचे प्रतिनिधी आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूंनी अपूर्ण माहिती दिली जात असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. पाच गावांपैकी पेरणे येथील मलजल प्रक्रिया केंद्राची प्रस्तावित जागा खासगी मालकीची असल्याचे आम्हाला मार्च महिन्यात अधिका-यांकडून समजले, अशी माहिती व्हिजन अर्थ केअर कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली.

भिगवण गावातील जागा वनविभागाची असल्याने या गावातील मलजल प्रक्रिया केंद्रही बदलले जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून बुधवारच्या बैठकीत आम्हाला समजले, अशी भूमिका व्हिजन अर्थ केअरच्या प्रतिनिधींनी मांडली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी व्हिजन अर्थ केअर कंपनीच्या दिरंगाईबाबत ताशेरेही ओढले. प्रकल्प अहवाल अद्याप शून्यात असल्याने प्रशासकीय पातळीवर पुढील काहीच कार्यवाही करता येत नसल्याने प्रकल्प आराखडा लवकर सादर करा, असा निर्देशही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिला.

नमामि चंद्रभागा प्रकल्पासाठी नगरविकास खात्याकडून अद्याप ६८.६ लाख रुपये येणे बाकी आहे. या प्रकल्पाच्या तपशीलाबाबत विभागीय आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर बोलता येईल. – पूनम मेहता, सहआयुक्त, नगरपरिषद प्रशासन

प्रकल्प आराखडा सादर करण्यासाठी अजून पंधरा दिवस लागतील, असे स्पष्टीकरण व्हिजन अर्थ कंपनीने दिले. प्रत्यक्षात प्रकल्प आराखडा सादर झाल्यानंतर महिन्याभरात कार्यवाहीला सुरुवात करु, असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाला हवी आहे लेखी तक्रार

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी २ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या ‘नमामि चंद्रभागा’ संदर्भातील आढावा बैठकीतील तपशील देण्यास नकार दिला. या बैठकीत जिल्हा परिषदेसह, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच इतर संबंधित विभाग सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेला व्हिजन अर्थ केअर कंपनीबाबत आक्षेप असेल तर लेखी तक्रार देणे अपेक्षित असल्याची भूमिका पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.

प्रकल्प राबवण्यासाठी आम्ही तत्पर

नमामि चंद्रभागा हा प्रकल्प राबवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. नमामि चंद्रभागा प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वतोपरिने काम केले जाईल, असे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.