रायगडमधील संशयित बोटीत शस्त्रांनंतर, दोन चाॅपरही आढळले; आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल

82

रायगड संशयित बोट प्रकरणात मुंबईत आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या बोटींच्या तपासात तीन एके- 47 आणि काडतुसे सापडल्यानंतर, आता या बोटींवर 2 चाॅपरही आढळले आहेत. एटीएस आणि एनआयएकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

रायगड संशयित बोट प्रकरणी ATS ने मोठी माहिती दिली आहे. बोटीमध्ये AK47 नंतर आणखी नवी शस्त्रे सापडली आहेत. एटीएसला बोटीमध्ये 2 तलवार आणि 2 चाॅपरही सापडले आहेत. एटीएसने या बोटीची तपासणी केल्यानंतर, या प्रकरणी मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( हेही वाचा: मुंबईत पुन्हा २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी, रेल्वे नियंत्रण कक्षाच्या व्हाॅट्सअॅपवर आला मेसेज )

दहशतवादाचा कोणताही पैलू नाही

राज्यातील रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर – श्रीवर्धन किनारपट्टीवर 16 मीटर लांबीची एक संशयास्पद बोट 18 ऑगस्टला सापडली होती. या बोटींवर 3 एके-47 रायफल आणि काडतुसे सापडली होती. यानंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात दहशतवादाचा कोणताही पैलू नसल्याचे, अधिका-यांनी सांगितले. संशयास्पद बोटीचे नाव लेडी हान असून तिची मालकी एका ऑस्ट्रेलियन महिलेकडे असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली होती. या बोटीतून तीन अॅसाॅल्ट रायफल स्फोटके आणि कागदपत्रेही जप्त करण्यात आल्याचे, फडणवीस यांनी सांगितले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.