एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आहे. शिंदे गटाच्या याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता राज्यातील सत्तांतरणाच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्यानंतर आता शिवसेना-भाजप युतीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. याबाबतच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे. दोन्ही पक्षांनी चर्चा करुन तडजोड करुन शेवट गोड करा, असे विधान दीपक केसरकर यांनी केले आहे.
ही सकारात्मक घटना
ठाकरे-फडणवीस चर्चेकडे आम्ही सकारात्मक दृष्टीने बघतो. मी 50 आमदारांच्या भावना व्यक्त करत आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्यात भाजपचं प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून महाराष्ट्राचा विकास करायचं ठरवलं याच्यासारखी दुसरी चांगली गोष्ट कुठलीही नसल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः तुम्हाला शिवसेना वाचवायचीय की राष्ट्रवादी मोठी करायचीय? शिंदे गटाचा पवारांना थेट सवाल)
शेवट गोड करा
शिवसेनेचे आमदार म्हणून आम्हाला काही हक्क आहेत. पण आजही आमचे पक्षप्रमुख निर्णय घेतील यासाठी आम्ही थांबलो आहोत. त्यामुळे आजही तुम्ही भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी बोलणी करा, तुमचा मान-सन्मान राहील अशी तडजोड तुम्ही करा आणि शेवट गोड करा. शेवट गोड करण्याचं सामर्थ्य उद्धव ठाकरे साहेब तुमच्याकडे आहे, असे म्हणत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना आवाहन केले आहे.
(हेही वाचाः “… तर नावं सांगा”, हॉटेल बाहेर येताच एकनाथ शिंदेंचं ठाकरेंना चॅलेंज)
Join Our WhatsApp Community