आतापर्यंत शिवसेनेच्या ठाकरे गटाची बाजू लढवणारे आणि काल पर्यंत ठाकरेंसोबत असलेले शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे सोमवारी एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्याचे सांगितले जात आहेत. ऱविवारी त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदाच्या विरोधात मतदान देखील केले होते. मात्र सोमवारी सकाळी संतोष बांगर हे थेट शिंदे गटाच्या बसमध्ये चढताना पाहायला मिळाले. असेही सांगितले जात आहे की, रविवारी रात्री बांगर यांची एकनाथ शिंदेसोबत चर्चा झाली होती. त्यामुळे विधानसभेत शिंदे गट आणि भाजप सरकारची बहुमत चाचणी होण्याआधीच शिवसेनेला आणखी एक धक्का बसल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा – अखेर एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी तर गोगावलेंची प्रतोद पदी निवड वैध)
दरम्यान, शिवसेनेत बंड झाल्यानंतर संतोष बांगर हे भावनिक भाषण केले होते. त्याशिवाय त्यांनी आपल्या जिल्ह्यात बंडखोरांविरोधात जाहीर भूमिका देखील घेतली होती मात्र आता बांगर यांनी आपला निर्णय बदलल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. हिंगोलीतील कळमनुकरीचे बांगर हे आमदार आहेत.
२४ जून रोजी हिंगोलीत शिवसेनेच्या वतीने बंडखोराविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी संतोष बांगर यांनी भाषण केले होते. या भाषणात ते खूप रडले होते. तुम्ही पुन्हा पक्षात या, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम्हाला माफ करतील, असे आवाहन केले होते. निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर माझी इतकी मोठी मिरवणूक काढण्यात आली नव्हती, ती आज काढण्यात आली. शिवसैनिक कायम उद्धव ठाकरेंच्या पाठिशी असणार आहे, असे त्यांनी म्हटले होते. आणि याच भाषणाची जोरदार चर्चा देखील झाली होती.
Join Our WhatsApp Community