शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि सत्तानाट्यावर पडदा पडला. या सत्तांतरानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीमध्ये पत्रकार परिषद घेतली. परिषदेच्या सुरुवातीलाच त्यांनी मातोश्रीवर तुम्हा सर्वांना सन्मानाने बोलावले आहे, असे बोलून 40 नाराज आमदारांना टोला लगावला आहे.
धनुष्यबाण हे चिन्ह कोणीही हिरावून घेऊ शकत नाही
शिंदे गट धनुष्यबाण या पक्षाच्या चिन्हावर बोलताना, उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेपासून धनुष्यबाण हे चिन्ह कोणीच वेगळे करु शकत नाही, असे मी ठामपणे सांगतो आणि हे मी काही हवेत सांगत नाही, तर कायद्याची व्यवस्थित माहिती घेऊन, चर्चा करुन बोलतो आहे. शिवसेनेने एकदम साधी माणसं मोठी केली. राजकीय पार्श्वभूमी न पाहता या माणसांना मोठे केले. ती माणसं सोडून गेली. पण अजूनही काही साधी माणसे आमच्यासोबत आहेत. ते खरे शिवसैनिक आहेत आणि मी त्यांचा मनापासून आभारी आहे, असे म्हणत ठाकरे यांनी नाराज आमदारांना टोला लगावला आहे.
( हेही वाचा: ‘इगोपेक्षा कार्यकर्त्यांच्या भावना महत्वाच्या, अजूनही वेळ गेलेली नाही!’, शिंदे गटाचे उद्धव ठाकरेंना आवाहन)
माझा कायद्यावर आणि लोकशाहीवर विश्वास
विधीमंडळ पक्ष आणि रस्त्यावरचा पक्ष यात फरक आहे. शिवसेना हा रस्त्यावरचा, सर्वसामान्यांचा पक्ष आहे. काही आमदार गेले म्हणजे पक्ष संपत नाही. पक्ष काही वस्तू नाही की कोणीही उचलून नेईल. माझा कायद्यावर आणि लोकशाहीवर विश्वास आहे. 11 जुलैला योग्य तोच निर्णय येईल, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community