मागील काही दिवसांपासून मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडलेले पहायला मिळत असून, ९८ दिवसांमध्ये रस्त्यांवरील ७ हजार २११ खड्डे बुजवल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खड्ड्यांचे प्रमाण कमी असल्याचा दावा केला जात असला तरीही मुंबईतील अनेक डांबरी रस्त्यांवर खड्ड्यांची विवरे निर्माण झालेली पहायला मिळत आहे.
मंबईतील रस्त्यांवर पावसाळ्यात होणाऱ्या खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी त्याचप्रमाणे रस्ते देखभाल करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने पथक आणि कंत्राटदार नेमण्यासह विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. यंदा १ एप्रिल २०२२ ते ७ जुलै २०२२ या कालावधीत महापालिकेने आपल्या हद्दीतील रस्त्यांवर सुमारे ७ हजार २११ खड्डे बुजवले आहेत. त्याचे क्षेत्रफळ सुमारे १२ हजार ६९५ चौरस मीटर इतके आहे. गतवर्षी याच कालावधीत महापालिकेने सुमारे १० हजार १९९ खड्डे बुजवले होते, म्हणजेच यंदा खड्ड्यांच्या समस्येत घट झाली आहे, असा दावा अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी केला.
रस्त्यांवर दुप्पट खड्डे
प्रशासनाने हे खड्डे बुजवल्याचा दावा केला असला तरी मुंबईतील अनेक भागांमधील रस्त्यांवर खड्डे कायमच आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. तर वांद्रे खार पश्चिम भागात सर्वात जास्त खड्डे पडलेले पहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रशासनाने ७ हजार खड्डे पडल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात त्याच्या दुप्पट रस्त्यांवर खड्डे पडल्याचे पहायला मिळत असून, यामुळे नागरिकांना खड्ड्यांमधून मार्ग काढत जावे लागत आहे.
कोल्डमिक्स जाते वाहून
महापालिकेने रस्त्यांवरील खड्डे शोधून ते भरण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार केली आहेत. या पथकांद्वारे खड्डे शोधून ते भरण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येते. खड्डे विषयक तक्रार प्राप्त झाल्यानंतर तो भरण्यासाठी ४८ तासांची मुदत असली तरी कोल्डमिक्स तंत्रज्ञानाद्वारे २४ तासाच्या आतमध्ये खड्डे भरण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाने केला असला, तरी अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये टाकलेले कोल्डमिक्सच वाहून जाऊन पुन्हा एकदा खड्डे पडलेले आहेत.
तक्रार नोंदवण्याचे आवाहन
मुंबई महानगरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), रेल्वे, खासगी लेआउट याप्रमाणेच इतरही शासकीय प्राधिकरणांच्या अखत्यारित काही रस्ते आहेत. त्या-त्या रस्त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणांची असते. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना नम्र विनंती आहे की, अशा इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी संबंधित प्राधिकरणाकडे कृपया तक्रार नोंदवावी,असे आवाहनही महापालिकेने केले आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांविषयक तक्रार नोंदविण्यासाठी खालीलप्रमाणे पर्याय नागरिकांना उपलब्ध आहेतः
- ऑनलाइन पोर्टल/अॅप: MyBMCpotholefixit ॲप
- आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक: 1916
- सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्र (CFC)
- सर्व २४ विभाग कार्यालयात लेखी तक्रारी देणे
- टोल फ्री दूरध्वनी क्रमांक: १८००२२१२९३
- ट्विटर: @mybmcroads
- बीएमसी व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक: 91-8999-22-8999