भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या माटुंगा येथील निवासस्थानाबाहेर रविवारी एक संशयास्पद बॅग सापडली आहे. त्यांच्या घराबाहेर ही बॅग अज्ञात व्यक्ती सोडून गेल्याचे समजते. या बॅगेत सोने, चांदी, पैसे आणि देवाच्या मूर्ती असा ऐवज सापडला असून पोलिसांनी पंचनामा करून बॅग ताब्यात घेतली आहे. मात्र ही बॅग नेमकी कोणी आणि का ठेवली याचा तपास सुरू आहे.
काय घडला प्रकार?
लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी त्यांना सुरक्षारक्षकाचा फोन आला. त्यांच्या घराबाहेर एक बॅग असल्याची माहिती सुरक्षारक्षकाने दिली. त्यानंतर मी तात्काळ माटुंगा पोलिसांना फोन केला. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बॅगची तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना या बॅगेत सोने, चांदी, पैसे आणि देवाच्या मूर्ती असा ऐवज सापडला. पोलिसांनी पंचनामा करून ही बॅग ताब्यात घेतली आहे. माझ्या घराबाहेर बंदोबस्त असतानाही अज्ञात व्यक्ती अशाप्रकारे बॅग ठेवून जाते. त्यामुळे मी देखील धास्तावलो आहे. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी हा प्रसंग घडल्याने माझे कुटुंबीयही घाबरले आहेत, अशी प्रतिक्रिया लाड यांनी व्यक्त केली.
(हेही वाचा – शिवसेनेच्या तानाजी सावंतांची सोलापूर जिल्हा संपर्क पदावरून हकालपट्टी)
तसेच हा प्रकार याअगोदर झाला होता. त्यामुळे पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी, अशी मागणी लाड यांनी केली आहे. दरम्यान, आता पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत. ही बॅग लाड यांच्या घराबाहेर कोणी सोडली याचा तपास सुरू असून त्यानंतर या मागील गुढ सर्वांसमोर येईल, असे पोलिसांकडून सांगितले जात आहे. तर पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास माटुंगा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या वस्तू ताब्यात घेऊन अज्ञात चोरट्या विरुद्ध घडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती माटुंगा पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community