शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात शामिल झालेले आमदार संतोष बांगर यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी केली आहे. तसेच, त्यांची शिवसेनेतूनही हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आमदार संतोष बांगर संतापले. मलाच काय साध्या तालुका प्रमुखांनाही ते काढू शकत नाहीत. आमचीच खरी शिवसेना आहे, अशा शब्दांत संतोष बांगर यांनी आपला संताप व्यक्त केला.
मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे आणि राहणार
मला काढण्याचा अधिकार कोणालाही नाही. मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी मतदान केले आणि सोमवारी बातमी आली की, तुम्हाला शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष पदावरुन काढले. मी हे मान्य करत नाही. मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे. जिल्हाप्रमुख राहणार. माझ्या मतदारसंघातले उपजिल्हाप्रमुख, सह संपर्क प्रमुख, तालुका प्रमुख, सर्कल प्रमुख, उप तालुका प्रमुख, शहर प्रमुख, शाखा प्रमुख यांना कोणालाही काढण्याचा अधिकार नाही. मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे, असे संतोष बांगर यांनी सांगितले.
( हेही वाचा: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘डिटेक्टीव्ह देवेंद्र’; ‘सामना’तून फडणवीस यांच्यावर टीका )
एकनाथ शिंदे म्हणाले, तूच जिल्हाप्रमुख
जिल्हाप्रमुख पदावरुन काढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुमची काही चर्चा झाली का? या प्रश्नावर बांगर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यांनी मला सांगितलं की, तूच जिल्हाप्रमुख आहे आणि खरी शिवसेना आपलीच आहे, असे बांगर म्हणाले.
Join Our WhatsApp Community