रविवारी, १० जुलै रोजी मुंबईत पावसाची हलकी सर दिसून आली असताना एकट्या चिंचोळी अग्निशमन केंद्रातील पावसाच्या नोंदीने वेधशाळेलाही गोंधळात टाकले आहे. नजीकच्या भागांत पावसाचा थांगपत्ता नाही. सोमवारी, ११ जुलै रोजी सकाळी गेल्या २४ तासांतील पावसाच्या नोंदीत चिंचोळी अग्निशमन केंद्रात चक्क १७२.६९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चिंचोळी अग्निशमन केंद्रातील पावसाच्या नोंदीतील गोंधळाचा हा सलग दुसरा दिवस आहे. या गोंधळामागे केंद्रातील स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्रावर विराजमान झालेल्या कावळ्याचा कारनामा असल्याचा प्राथमिक संशय पालिकेच्यावतीने व्यक्त करण्यात आला.
पर्जन्यमापक केंद्रावर कावळा बसला, म्हणून बिघाड झाला
रविवारी, १० जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास चिंचोळी अग्निशमन केंद्रातील पावसाच्या नोंदीत पहिल्यांदा गोंधळ दिसून आला. गेल्या सहा तासांतील नोंदीत चिंचोळीत १६८.१४ मिलीमीटर पाऊस झाल्याचे दिसून आले. जवळच असलेल्या मालवणी अग्निशमन केंद्रात केवळ ४.३२ तर दिंडोशीत ४.५६ मिमी पावसाची नोंद होती. या गोंधळानंतर सोमवारी सकाळी पुन्हा गोंधळाची पुनरावृत्ती झाली. चिंचोळी अग्निशमन केंद्रात १७२.६९ मिमी पावसाच्या नोंदीनंतर हा गोंधळ पुन्हा उजेडात आला. नजीकच्या मालवणी अग्निशमन केंद्रात ८.३४ मिमी, तर दिंडोशी अग्निशमन केंद्रात ७.८४ मिलीमीटर एवढ्याच पावसाची नोंद होती. मुंबईतील अग्निशमन केंद्रात स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्रे असून, हा गोंधळ निश्चितच मिटलेला नसल्याचे दुपारपर्यंतचे चित्र होते. मुंबईतील अग्निशमन केंद्रातील स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्रे पालिकेच्यावतीने बसवण्यात आली आहेत. या केंद्रातून उपलब्ध माहिती संगणकाच्या माध्यमातून गोळा केली जाते. मात्र स्वयंचलित पर्जन्य केंद्रावर कावळा बसल्याने हा प्रकार होऊ शकतो, असे अजब उत्तर पालिका आपत्कालीन विभागाकडून दिले गेले. याबाबतची माहिती घेऊन कळवले जाईल, असे पालिकेच्या आपत्कालीन विभाग यंत्रणेकडून कळवले गेले.
(हेही वाचा गोवा तो झांकी है, राजस्थान, छत्तीसगढ़ बाकी है। चित्रा वाघ यांचे ट्विट)
Join Our WhatsApp Community