कोकणातील चाकरमानी गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होतात. ३१ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान २५०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला असून या गाड्यांचे आरक्षण २५ जूनपासून सुरु झाले आहे. आतापर्यंत मुंबई विभागातून २६ जूनपासून ११२२ गाड्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. यात ग्रुप बुकिंगला सर्वाधिक पसंती मिळाली आहे.
( हेही वाचा : एसटीचे निवृत्त कर्मचारी शिल्लक रजेच्या पगारापासून वंचित!)
गणेशोत्सवासाठी चाकरमानी वर्ग मोठ्या संख्येने कोकणात दाखल होतो. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवाठी कोकणात जाण्यासाठी अतिरिक्त गाड्यांचे नियोजन एसटी महामंडळाकडून केले जाते. यंदाही मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांचे ५० टक्के आरक्षण पूर्ण झाले आहे.
बसचे आरक्षण
- गणेशोत्सवासाठी २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान या गाड्या कोकणात रवाना होतील.
- ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासासाठी येतील.
- बस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून आरक्षण बसस्थानक किंवा महामंडळाच्या संकेस्थळावर, मोबाइल अॅपद्वारे, खासगी बुकिंग एजंट व त्यांच्या अॅपवर उपलब्ध आहे.
एसटी महामंडळ सज्ज
गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.
Join Our WhatsApp Community