मुंबईत ३३ वर्षांमध्ये केवळ ८०० किलोमीटर रस्त्यांचेच सिमेंटीकरण

70

मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात महापालिकेने रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यास ३३ वर्षांपूर्वी सुरुवात केली.तेव्हापासून आजवर केवळ ८०० किलोमीटर लांबीचे रस्ते करण्यास महापालिकेला यश आले आहे. त्यामुळे वर्षाला केवळ सरासरी २५ किलोमीटर लांबीचेच रस्ते महापालिकेला करता आले असल्याची माहिती समोर येत आहे.

( हेही वाचा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केली पूरग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची पाहणी)

रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण

मुंबई महापालिकेने १९८९-९० पासून मुंबईतील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यास सुरुवात केली. आणि मुंबईतील रस्त्यांची एकूण लांबी तेव्हा १९४१.१६ एवढी होती, जी आज २०५५ किलोमीटर लांबीएवढी आहे. परंतु आता ३३ वर्षे होत आली तरी महापालिकेला यापैंकी ८०० किलोमीटर लांबीचेच रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी तसेच खड्डे मुक्त रस्ते असावेत यासाठी, मुंबईतील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रतिवर्षी खड्ड्यांची संख्या आणि समस्या हळूहळू कमी होत असल्याचा दावा महापालिका प्रशासन करत आहे. मागील ५ वर्षात ६०८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. आत्तापर्यंत मुंबईतील सुमारे ८०० किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाचे झाले आहेत. अशा रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या निकाली निघाल्या आहेत. यापुढे ६ मीटर रुंदीचे रस्तेही टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे धोरण महानगरपालिकेने स्वीकारले आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण होऊन खड्ड्यांची समस्या निश्चितच कमी होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे.

प्रत्येक वर्षी सरासरी ६० ते ७० रस्त्यांचा समावेश केला जातो. पण या प्रस्तावित रस्त्यांचे सिमेंटीकरण होत नाही. सन २०१३-१४ ते २०१५-१६ या तिन वर्षांचा रस्ते विकासकामांचा बृहत आराखडा तयार करून १२३९किलो मीटर लांबीच्या रस्त्यांची ७७७४ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली होती. त्यामुळे जर मागील पाच वर्षांमध्ये ६०८किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले असेल तर त्या आधीच्या २७ वर्षांमध्ये केवळ १९२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचेच सिमेंटीकरण करण्यात आले आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे मागील २७ वर्षांमध्ये वर्षाला केवळ सरासरी सात किलोमीटर रस्त्यांचे बांधकाम करता आले असे स्पष्ट होत आहे.

पर्यायी वाहतूक व्यवस्था करणे ही प्रमुख समस्या

तर प्रशासनाने केलेल्या दाव्यानुसार मागील पाच वर्षांमध्ये ६०८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले असेल तर वर्षाला सरासरी १२१ किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यात आले आहे. मात्र, ३३ वर्षांतील एकूण ८०० किलोमीटर लांबीच्या रस्ते विकासाचा अंदाज घेतल्यास वर्षाला सरासरी केवळ २५ किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचा विकास करता आला आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

महापालिकेच्या रस्ते विभागातील काही निवृत्त अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील प्रत्येक वर्षी वाहनांची संख्या वाढत आहे, परिणामी वाहतूकही तेवढीच वाढत आहे. सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांमध्ये रस्त्याखालून जाणारे विविध सेवा सुविधांचे जाळे अर्थात युटीलिटीज हलवणे तसेच रस्त्याचे काम सुरु असताना पर्यायी वाहतूक व्यवस्था करणे ही प्रमुख समस्या असते. या दोन्ही समस्या जर नसतील तर रस्त्यांचे सिमेंटीकरणाला तेवढासा वेळ लागणार नाही. साधारणत: ९० फुटी रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यासाठी येथील एक किलोमीटरचे काम हे कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दोन ते तीन महिन्यांमध्ये पूर्ण व्हायला हवे,असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु प्रत्येक सिमेंटीकरणाच्या कामाला युटीलिटीज शिफ्टींग आणि वाहतूक पोलिसांकडून पर्यायी वाहतुकीची व्यवस्था न होणे हेच कारण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.