राज्यातील अमरावती जिल्ह्यात कॉलरा या आजाराने धुमाकूळ घातला आहे. या आजारामुळे एकट्या अमरावतीत पाच जणांनी जीव गमावला असून, १८१ लोकांना आतापर्यंत या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे या आजाराविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. कॉलरा या आजाराला बोली भाषेत पटकी असे म्हटले जाते. कॉलराची लागण सुरुवातीला तुरळक स्वरुपात आढळते. या आजाराचा प्रसार वेगाने होत असल्याने उद्रेकही पटकन होतो.
कॉलरा आजाराविषयी
कॉलरा हा जलजन्य आजार आहे. रुग्णाला पाण्यासारखे पातळ जुलाब होतात. सुरुवातीला रुग्णाला जुलाब होतात, त्यानंतर उलट्याही होतात. हा आजार व्हीब्रीओ या विशिष्ट आजारामुळे होतो. सर्व वयोगटातील स्त्रिया आणि पुरुषांना कॉलराची लागण होते.
कॉलरा आजाराचा प्रसार
कॉलराची बाधा झालेल्या रुग्णांच्या विष्ठेचा पाण्याच्या स्त्रोताशी संबंध आल्यानंतर कॉलराचा विषाणू पाण्यात पसरतो. कॉलराचा विषाणू असलेले पाणी पिण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी वापरल्यास या आजाराचा प्रसार होतो. मलःनिस्सारणाच्या योग्य पद्धतीच्या अभावामुळे रुग्णाच्या विष्ठेचा पाण्याच्या स्त्रोतांशी संपर्क येतो.
कॉलरा आजाराची लक्षणे
कॉलरा आजाराची लक्षणे पाच दिवसांच्या आत रुग्णाच्या शरीरात दिसून येतात.
- पाण्यासारखे जुलाब होणे, उलट्या होणे
- हृदयाचे ठोके वाढणे
- तोंडाला कोरड पडणे
- तहान लागणे
- स्नायूंमध्ये गोळे येणे
- अस्वस्थता वाढणे
कॉलरा आजारावर उपचारपद्धती
- घशाला कोरड पडल्यास पेज, सरबत आदी घरगुती पेये प्यावीत
- घशाला पडलेली कोरड जात नसल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन उपचाराला तातडीने उपचार सुरुवात करावी
- कित्येकदा रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करुन रिंगर लॅक्टेट औषध दिले जाते
- झिंक टॅब्लेटमुळे अतिसाराचा कालावधी २५ टक्क्याने कमी होतो, तसेच उलटीचेही प्रमाण कमी होते
- रुग्णाला रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी अॅन्टीबायोटिक्स औषधेही दिली जातात.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
- परिसरात शुद्ध पाणीपुरवठा असावा तसेच मानवी विष्ठेची योग्य त-हेने विल्हेवाट लावावी
- हात सातत्याने स्वच्छ धुवत रहा. शौचानंतर, अन्नाचे सेवन करण्यापूर्वी तसेच जेवण बनवण्यापूर्वी, लहान मुलांची विष्ठा धुतल्यानंतर हात धुवून वैयक्तिक स्वच्छता राखा
- तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णावर तातडीने उपचार करायला सुरुवात करावी
- बाळाचे गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण करुन घ्या