शुक्रवारपासून पुढील 75 दिवस देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना कोविडचा बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दरम्यान या मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी दिली. या देशव्यापी मोहिमेसंदर्भात आपली पंतप्रधानांशी चर्चा झाली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज, गुरूवारी मंत्रिमंडळ बैठकीच्यावेळी दिली.
(हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारचं मोठं गिफ्ट, पेट्रोल-डिझेलच्या दरांत मोठी कपात)
18 वर्षांवरील सर्वांना मोफत बूस्टर डोस
मुख्यमंत्र्यांनी यावेळी आरोग्य विभागास निर्देश दिले की, या देशव्यापी मोहिमेमध्ये एकही दिवस वाया घालू न देता सर्व संबंधितांना बूस्टर डोस मिळालाच पाहिजे, यासाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, आरोग्य संस्था यांना देखील सहभागी करून घ्यावे. याविषयी पुरेशी जन जागृती करावी असेही मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने बुधवारी देशभरात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस हा मोफत देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे 15 जुलैपासून 75 दिवस आता 18 वर्षांवरील पात्र नागरिकांना बूस्टर डोस मोफत घेता येणार आहे.
काय आहे केंद्र सरकारचा निर्णय
केंद्र सरकारच्या बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताच्या स्वातंत्र्याचं 75 वे म्हणजेच अमृतमहोत्सवी वर्ष आपण साजरं करत आहोत, त्यामुळे 15 जुलैपासून पुढचे 75 दिवस 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाचा बूस्टर डोस मोफतमध्ये देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. याआधी केवळ 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांनाच बूस्टर डोस मोफत दिला जात होता. पण आता 18 वर्षांवरील सर्वांनाच हा डोस मोफत मिळणार आहे. त्यामुळे बूस्टर डोससाठी पात्र असलेले सर्व नागरिक हा डोस मोफतमध्ये घेऊ शकणार आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
Join Our WhatsApp Community