मुंबईकरांनो, ‘हर घर तिरंगा’मध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्या! अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांचे आवाहन

98
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार देशभरात दिनांक ११ ऑगस्ट २०२२ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवला जाणार आहे. मुंबई महानगरात देखील हा उपक्रम राबवला जाणार असून त्यादृष्टीने प्रशासनातील सर्व संबंधित विभागांना नेमून दिलेली कार्यवाही करावी, असे निर्देश  महापालिका अतिरिक्त  आयुक्त (शहर)  आशीष शर्मा यांनी दिले आहेत. तसेच सर्व मुंबईकरांनी ‘हर घर तिरंगा’ उपक्रमामध्ये स्वयंस्फूर्तीने व हिरीरीने भाग घ्यावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने  शर्मा यांनी केले आहे.

११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवणार

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारकांचे तसेच स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी, या उद्देशाने केंद्र शासनाच्या वतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ हे व्यापक अभियान राबविण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार देशभरात ११ ऑगस्ट २०२२ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने देखील सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरात ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेच्या स्तरावर कार्यान्वयन समिती नेमण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक महानगरपालिका अतिरिक्त  आयुक्त (शहर)  आशीष शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली, त्यावेळी  शर्मा यांनी सर्व विभाग व खात्यांना विविध निर्देश दिले. सहआयुक्त (सामान्य प्रशासन)  मिलीन सावंत यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, विविध खातेप्रमुख या बैठकीस उपस्थित होते.

शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, संस्था, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांवर राष्ट्रध्वजाची उभारणी

केंद्र शासनाच्या सुचनेनुसार, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात प्रत्येक नागरिकाच्या घरी, प्रत्येक इमारत तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय आस्थापना, खासगी आस्थापना, विविध संस्था, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे. तिरंगा ध्वज हा निःशुल्क असणार नाही. ही बाब लक्षात घेता, नागरिकांनी स्वेच्छेने तिरंगा ध्वज खरेदी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, उपक्रमामध्ये सहभागी होणाऱया कुटुंबे / घरे / इमारती यांची संख्या निश्चित करणे, त्यानुसार ध्वजांची संख्या निश्चित करणे, ध्वज उपलब्ध करण्यासाठी नियोजन करणे, तिरंगा झेंडा पुरवठादारांशी समन्वय साधून वितरण करणे, सामान्य नागरिकांना ध्वज खरेदी करण्यासाठी ठराविक ठिकाणे निश्चित करून त्याची माहिती नागरिकांना देणे, तसेच सर्वांनी प्रत्यक्ष ध्वज लावणे, राष्ट्रध्वज संहितेचे पालन करणे अशा सर्व मुद्यांच्या दृष्टीने जाणीव जागृती करण्यासाठीचे नियोजन व इतर सर्वंकष चर्चा या बैठकीत करण्यात आली. हा संपूर्ण उपक्रम राबवितांना भारतीय ध्वजसंहिता २००२ नुसार राष्ट्रध्वजाचा मान राखला जाईल व त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहनही अतिरिक्त आयुक्त  आशीष शर्मा यांनी केले. दरम्यान, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा भाग म्हणून दिनांक ९ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत विविध कार्यक्रम, उपक्रम देखील जनसहभागातून राबविण्यात यावेत, असे निर्देशही अतिरिक्त  आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांनी यावेळी दिले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.