जोगेश्वरी पूर्व येथील कुरिअर कंपनीच्या कार्यालयात पार्सलचा स्फोट झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी सांताक्रूज येथून एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली असून, त्याने विम्याच्या पैशांसाठी चक्क शोभेच्या दारूचा वापर करत टाईमबॉम्ब बनवून तो कुरिअर केला होता, अशी धक्कादायक कबुली पोलिसांना दिली आहे.
जोगेश्वरी पूर्व येथील ‘ब्ल्यू डार्ट’ कुरिअर कंपनीच्या कार्यालयात बुधवारी दुपारी एका पार्सलचा स्फोट झाला, या स्फोटाची तीव्रता कमी असल्यामुळे मोठे नुकसान झाले नसले तरी या घटनेची गंभीरता ओळखून पोलिसांनी पार्सल पाठवणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला सांताक्रूझ पूर्व येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने धक्कादायक माहिती पोलिसांना दिली.
…म्हणून टाईमबाॅम्ब कुरिअर केला
युट्युबवर एका बँकेची जाहिरात पाहिली होती, त्या जाहिरातीत एखादी वस्तू, साहित्याला प्रवासादरम्यान किंवा हाताळणी दरम्यान काही नुकसान झाल्यास तसेच शिपमेंट व ट्रांझीट पॉलीसीच्या माध्यमातून इलेक्ट्राॅनिक वस्तूंसाठी त्या वस्तूची मूळ किंमत व त्यावर १० टक्के नुकसान भरपाई दिली जाते. ही जाहिरात बघून त्याने झटपट पैसे कमवण्याच्या उद्देशातून फटाक्यांची दारू एक साधा मोबाईल, मोबाईल बॅटरी आणि कॅम्प्युटर प्रोसेजरच्या साहाय्याने चक्क टाईमबॉम्ब तयार केला, मोबाईलच्या अलार्मवर त्या बॉम्बचा वेळ सेट करून ते पार्सल तयार केले. पार्सलवर दिल्लीचा बनावट पत्ता टाकून, ब्यु डार्ट कुरिअर कंपनीकडे हे पार्सल ऑनलाइन पाठवले होते.
( हेही वाचा: ‘छत्री’ ही पावसापासून संरक्षणासाठी बनलीच नव्हती; वाचा छत्रीच्या उगमाचा रंजक इतिहास)
अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी
या पार्सलमधील वस्तू खरेदी बनावट ‘इनवॉईस’ एका वेबसाईटच्यामार्फत तयार केले, या वस्तूंचा आय.सी.आय.सी.आय. (लोमबार्ड) या इन्शुरन्स कंपनीकडून ऑनलाईन इन्शुरन्स पॉलीसी घेतली होती. या वस्तूचा स्फोट होऊन विमा कंपनीकडून विमा मिळेल, या हेतूने त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याने दिलेल्या या धक्कादायक माहितीमुळे पोलीसदेखील काही वेळासाठी चक्रावले होते, याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची रवानगी डोंगरी बालसुधार गृहात करण्यात आली आहे.