१९४७ची फाळणी ही एक वेदनादायक घटना आहे. तेव्हा फक्त दोन देशांचे विभाजन झाले नाही, तर अनेक मनामनांची ताटातूट झाली. एक रक्तरंजित इतिहास त्यावेळी घडला.
अनेक मन दुभंगली, संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांची आयुष्य संपली, प्रेतांनी भरलेल्या गाड्या एका देशातून दुस-या देशात जाऊ लागल्या. नद्यांची विभागणी झाली. जवळजवळ १४ दशलक्ष लोकांनी त्यावेळी स्थलांतर केले.
२० लाख लोकांच्या कत्तली त्यावेळी झाल्या. पाकिस्तानातले हिंदू आणि शीख भारतात येते होते, तर भारतातील काही मुसलमान पाकिस्तानात जात होते. त्याच काळात १८ ऑगस्ट १९४७ ला एक फोटो ‘टाईम्स मॅक्झिनमध्ये’ प्रसिद्ध झाला आणि तो एका कारणामुळे जगभरात गाजला.
कारण तो फोटो होता भारतातील इम्पेरियल सेक्रेटरिएट लायब्ररी नवी दिल्लीचा. त्या फोटोत असे म्हटले गेले होते की 1 लाख 50 हजार मोठमोठी पुस्तके दोन्ही देशांसाठी वेगळी करायची होती. त्या पुस्तकांची वाटणी भारत आणि पाकिस्तान यांच्या नावाने करण्यात येत होती आणि त्या पुस्तकांच्या ढिगा-यात एक माणूस कपाळाला हात लावून बसला आहे, असा तो फोटो होता.
बी. एस. केसवान हे तेथील ग्रंथपाल होते. हा फोटो डेव्हिड डगलस डंकन या अमेरिकन पत्रकाराने टाईम मॅगझीनसाठी काढला होता आणि हाच फोटो १५ ऑगस्ट १९४७ ला भारताच्या स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वर्षपूर्तीनिमित्त ‘फाळणीच्या वेळेचे वेगळे फोटो’ या सदरात परत एकदा प्रसिद्ध करण्यात आला आणि मग तो चर्चेत आला.
पुस्तकांच्या फाळणीचा हा फोटो चर्चेत आल्यानंतर, या फोटोबाबत शोध घेतला जाऊ लागला. त्यावेळी या फोटो संदर्भात या लायब्ररीचे माहिती अधिकारी वाय. रवींद्रनाथराव म्हणतात की हा फोटो १९४७ मधील सेंट्रल लायब्ररीचाच आहे. तसेच, बी.एस. केसवान यांच्या मुलाने मुकुंद केसवाननेदेखील त्याचे वडील सेंट्रल सेक्रेटरिएट लायब्ररीमध्ये ग्रंथपाल म्हणून काम करायचे असे सांगितले.
हिंदुस्थान टाइम्सने हा फोटो एका स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ट्वीटरवर टाकला आणि हा फोटो पु्न्हा एकदा चर्चेत आला. त्यानंतर त्यावर अनेक बुद्धीजीवींनी आपली मते मांडली. या फोटो बाबत अन्वेशा सेनगु्प्ता या लेखिकेने, स्वातंत्र्यानंतरचे प्रशासकीय बदल जे झाले त्या संदर्भात एक पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकात असे म्हटले आहे की, फक्त त्या देशातल्या प्रांतात असणा-या लायब्ररीज वेगवेगळ्या झाल्या.
या फोटोबाबत जेव्हा बी. एस. केसवान यांना त्यांच्या मुलाने मुकूल केसवान याने विचारले असता, त्यांनी हसून उत्तर दिले की, तुला माहितीय? की, पुस्तकांचे विभाजन हे कधीच झाले नव्हते. त्यानंतर मुकुल यांना असे वाटले की, फक्त वडिलांचा फोटो काढला गेला असेल, नंतर तो एडिट केला असेल. ज्यामध्ये भारत- पाकिस्तान असे बोर्ड लावलेले दिसत आहेत. कदाचित सनसनाटी निर्माण करण्यासाठी हा फोटो काढला गेला असावा, असे मुकुल यांना वाटते.
त्यामुळे १९४७ ला देशाची फाळणी झाली, माणसांची फाळणी झाली परंतु सुदैवाने पुस्तकांची मात्र फाळणी झाली नाही.
Join Our WhatsApp Community