चोरीचे मोबाईल विकत घेऊन परराज्यात त्याची विक्री करणाऱ्या दुकलीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या दुकलीजवळून पोलिसांनी ४९० स्मार्ट फोन्स,अमली पदार्थ तसेच विदेशी मद्यासह शस्त्रसाठा जप्त केला आहे. हो कारवाई मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर येथून करण्यात आली असून अटक करण्यात आलेले दोघे चोरीचे मोबाईल परराज्यात विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
देशासह परदेशात विक्री होते चोरीचे मोबाईल
मेहबूब खान (३७) आणि फियाज अकबर शेख (३१) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मेहबूब हा मुख्य आरोपी असून महाराष्ट्र नगर येथे राहणारा आहे, तर फियाज हा मोबाईल कारागीर असून ट्रॉम्बे चिंता कॅम्प येथे राहणार आहे. मुंबईत शहरासह रेल्वेमध्ये दररोज सरासरी २५० ते ३०० मोबाईल फोनची चोरी होत आहे, हे सर्व चोरीचे मोबाईल फोनचे नक्की काय होते, कुणाला विकले जातात, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्या टोळ्या मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत सक्रिय आहेत. देशातील काही राज्यांमध्ये तसेच नेपाळ, बांग्लादेशात चोरीच्या मोबाईलमधील ‘आयइएमआय’ क्रमांक काढून पाठवले जातात. या टोळीच्या मागावर मागील काही आठवड्यापासून मुंबई गुन्हे शाखेचे युनिट ६ चे पथक होते.
४१ एॅपल कंपनीचे फोन
मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर या ठिकाणी चोरीचे मोबाईल फोन विकत घेणारी टोळी असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ६ चे प्रभारी रवींद्र साळूंखे यांच्या पथकाला मिळाली होती, या टोळीच्या मागावर असणाऱ्या पोलीस पथकाने मेहबूब खान आणि फियाज अकबर शेख या दोघांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करण्यात आली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस पथकाने त्याच्या राहत्या घरी महाराष्ट्र नगर येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी परराज्यात पाठवणीसाठी पॅकिंग करून ठेवलेले ४९० स्मार्ट फोन मिळाले, त्यात ४१ अँपल कंपनीचे फोन आहेत, तसेच मेहबूब याच्या घरातून ९ किलो गांजा, विदेशी मद्याच्या १९४ बॉटल्स, दोन तलवारी असा एकूण ७४ लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ६ चे प्रभारी रवींद्र साळुंखे यांनी सांगितले. अटक करण्यात आलेला मेहबूब हा मुख्य आरोपी असून तो चोरीचे मोबाईल विकत घेण्याचे काम करणे, त्याच बरोबर अमली पदार्थ, विदेशी मद्याची तस्करी करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
(हेही वाचा मोडकसागर, तानसा पाठोपाठ तुळशी तलावही भरला)
मुंबईत दररोज २५० ते ३०० मोबाईल फोन चोरीला जातात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीचे मोबाईल खरेदी आणि विक्री करण्याऱ्या मोठ्या टोळ्या मुंबईसह राज्यभरात सक्रिय असून त्यापैकी मेहबूब हा एक आहे. मोटारसायकलवरून मोबाईल चोरी करणारे तसेच रेल्वेत मोबाईल चोरी करणारे चोर हे मेहबूबच्या संपर्कात असून या चोरांना ‘मशीन’ असे कोडवर्ड आहे. हे मशीन चोरलेले मोबाईल फोन मेहबूब याला आणून देत, मोबाईलची हालत बघून मेहबूब त्याची किंमत ठरवत असे, १० हजार रुपये किमतीचा स्मार्ट फोन चांगल्या स्थितीत असला, तर त्याचे मशीनला ३ हजार रुपये देण्यात येत होते, तसेच एॅपल कंपनीचा एकच फोन मशीनला १५ दिवसाची कमाई एकाच दिवसात करून देतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मेहबूब हा चोरीचे मोबाईल विकत घेऊन दुसरा आरोपी हा फियाज हा त्याचा आयएमइआय क्रमांक बदलत असे, ज्या फोनचा आयएमइआय क्रमांक बदली होत नसे हे फोन परराज्यात विकले जायचे, तर आयएमईआय बदललेले मोबाईल फोन मुंबईत ग्रे मार्केट मध्ये विकले जातात अशी माहिती मेहबुबच्या चौकशीत बाहेर आली आहे. मुंबईत दररोज सरासरी २५० ते ३०० मोबाईल फोन चोरीला जात असल्याची माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी रेल्वे आणि शहराची असून एकट्या मुंबई रेल्वे पोलीस आयुक्ताच्या हद्दीत दिवसाला सरासरी १५० मोबाईल फोन चोरीला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community