शरद पवार आता राहिले महापालिकांपुरते…

95

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे. या निवडणुकीवर उद्धव ठाकरे यांचं बारीक लक्ष आहे. आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा ही शिवसेना वाचवण्यासाठी नसून मुंबई पालिकेवरील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला जबरदस्त टक्कर दिली होती. उद्धव ठाकरेंना नाराज करु नये या एका कारणासाठी भाजपाने पालिकेवर सत्ता स्थापन केली नाही. यावेळी भाजपा आणि शिवसेनेत ‘काटे की टक्कर’ होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण मला असं वाटतं की भाजपा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सहज जिंकेल, याचं कारण एकनाथ शिंदेंचं बंड.

अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न

आता शरद पवार मुंबई महानगरपालिकेच्या मैदानात उतरले अशी बातमी प्रसिद्ध झालेली आहे. कोणता पक्ष आपल्या सोबत येईल असा विचार न करता कामाला लागण्याचे आदेश पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. ठाकरे काहीही करुन मुंबई पालिकेवरील सत्ता राखण्याचे प्रयत्न करणार आहेत. शरद पवारांचं राजकारण पाहिलं तर त्यांचं सर्वात मोठं स्वप्न होतं, ते म्हणजे पंतप्रधान बनण्याचं. हे स्वप्न आता कधीच पूर्ण होणार नाही. दुसरं स्वप्न म्हणजे कन्या सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवण्याचं, तेही स्वप्न आता खरं होणार नाही. निदान आपल्या वारसदारांचं राजकीय अस्तित्व तरी टिकून राहिल याचे प्रयत्न शरद पवार करत आहेत.

राजकारणावर पकड पण तरीही पराभव

पंतप्रधान बनण्याची इच्छा असलेला माणूस मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कामाला लागतो यापेक्षा वाईट गोष्ट ती कोणती? शरद पवारांना कधीही साडेतीन जिल्ह्याच्या पलीकडे जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. स्व-बळावर त्यांना मुख्यमंत्री देखील होता आलं नाही ही त्यांची खंत आहे. पण शरद पवारांच्या इको-सिस्टिमने या नावाचा फुगा खूप मोठा फुगवला होता. पवारांची महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड आहे याबद्दल वाद नाही. मी नेहमी म्हणतो जसं दिल्लीमध्ये नेहरुव्हियन होतं, तशी महाराष्ट्रात पवार-सिस्टिम आहे.

पण या सिस्टिमचा सामान्य जनतेला सहसा उपयोग झाला नाही. त्यांचे काही कार्यकर्ते त्यांना जाणता राजा म्हणत असले तरी सामान्य जनतेने त्यांना नाकारले. हे सत्य शरद पवारांना आणि त्यांच्या समर्थकांना पचवायला जड जात आहे. वर म्हटल्याप्रमाणे पंतप्रधानपदाचा उमेदवार मुंबई पालिकेच्या निवडणुकीत उतरतो हाच सर्वात मोठा पराभव आहे.

पवार हतबल

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप यशस्वी आहेत. सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री ते पंतप्रधान ही घोडदौड सकारात्मक राजकारणामुळे शक्य झाली. शरद पवारांना ज्या गोष्टीत रस होता किंबहुना आहे, अशा गोष्टींचा विचार नरेंद्र मोदींनी कधीच केला नाही. राष्ट्र सर्वप्रथम हा मंत्र जपत त्यांनी आपली वाटचाल केली आणि यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचले. आज मोदी न थकता न थांबता देशाची सेवा करत आहेत आणि मोदी ज्यांना गुरु म्हणून मान देतात ते शरद पवार मात्र हतबल होऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरले आहेत.

पवार-सिस्टिम पूर्णपणे कमकुवत

शरद पवारांनी जर क्षणिक सुखाचा विचार न करता सकारात्मक राजकारण केलं असतं तर कदाचित त्यांच्या पदरात यश पडलंच असतं. आपल्याच लोकांनी आपल्याला जाणता राजा म्हणणे यात मोठेपणा शोधून काय प्राप्त होणार आहे? एकनाथ शिंदेंनी केलेल्या उठावामुळे हे सिद्ध झालं की राजकारणातली पवार-सिस्टिम पूर्णपणे कमकुवत झालेली आहे. शरद पवारांना अजूनही कळलेलं नाही की नेमकं काय घडलं आणि आपल्यासारख्या मुरब्बी राजकारण्यासमोर हे घडलंच कसं? त्यामुळे आता दुर्दैवाने म्हणावं लागत आहे की शरद पवारांसारखे मोठे नेते आता राहिले फक्त महापालिकेपुरते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.