मंगळवारी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. अहिल्यादेवींचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळपासून येथे दिग्गज नेते देखील हजेरी लावत आहेत. पण या जयंती सोहळ्यादिनी देखील राजकारण झाल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील मंगळवारी चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. पण हा कार्यक्रम संपेपर्यंत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत हे देखील चौंडी येथे अहिल्यादेवींचे दर्शन घेण्यासाठी जात होते. पण चौंडीत दाखल होण्याआधीच त्यांच्या वाहनांचा ताफा पोलिसांनी चौंडीच्या सीमेवर अडवला. यावरुन आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
(हेही वाचाः सुप्रिया सुळेंची चर्चा होत असेल, तर रश्मी ठाकरेही मुख्यमंत्री पदासाठी सज्ज! शिवसेना आमदाराचे विधान)
सोहळा हायजॅक करण्याचा प्रयत्न
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडीला कुठलाही अभिनिवेश न ठेवता साजरी केली जाते. सर्व पक्षांचे लोक त्याठिकाणी अहिल्यादेवींचे आशिर्वाद घेण्यासाठी येतात. पण यावेळी सरकारी तंत्राचा उपयोग करुन अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती सोहळा हायजॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे अत्यंत चुकीचे असल्याचे म्हणत फडणवीस यांनी टीका केली आहे.
हे राष्ट्रीय पर्व
अहिल्यादेवी होळकर यांचे थेट वंशज असलेल्या राम शिंदे यांना देखील तिथे त्रास देण्यात आला. जे अहिल्यादेवी यांच्या विचारांवर चालतात त्यांना त्यांच्या जन्मस्थळी जाण्यापासून अडवलं जात आहे. अशाप्रकारे या जयंती सोहळ्याला हायजॅक करण्याचे कारण काय आहे?, असा सवालही फडणवीस यांनी केला आहे. अशाप्रकारचे पर्व हे राष्ट्रीय पर्व असून ते सर्वांनी मिळून साजरे करायचे असते. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करुन असे हायजॅकिंग बंद झाले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
(हेही वाचाः रुपाली चाकणकर यांना 24 तासांत जीवे मारण्याची धमकी)
Join Our WhatsApp Community