राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने खडसेंची जागा जप्त केली होती. ती जागा रिकामी करण्याची नोटीस ईडीकडून बजावण्यात आली आहे.
५ कोटी ७५ लाखांची संपत्ती जप्त
गेल्या वर्षी ईडीने खडसेंची ५ कोटी ७५ लाखांची संपत्ती जप्त केली होती. यात लोणावळ्यातील बंगला आणि जळगावमधील ३ फ्लॅट आणि ३ मोकळे भूखंड ईडीने जप्त केले होते. ही मालमत्ता १० दिवसांमध्ये रिकामी करण्याचा आदेश ईडीने दिला आहे. तसे नाही केल्यास कायदेशीररित्या या मालमत्ता रिकाम्या केल्या जातील, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे. तसेच संबंधित मालमत्ता विक्री, भाडेकरारावर किंवा हस्तांतरण करण्याची परवानगी कोणालाही देण्यात येऊ नये, असे नोंदणी महानिरिक्षक आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनाही कळवण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
जेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा एकनाथ खडसे महसूल मंत्री होते. त्यावेळेस त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत भोसरी येथील ३.१ एकर एमआयडीसीचा फ्लॅट खरेदी केला असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच या फ्लॅटची किंमत ३१ कोटी रुपये असून हा फ्लॅट ३.७५ कोटी रुपयांमध्ये विक्री झाला असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे कमी बाजारभाव दाखवून हा व्यवहार झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणामुळे खडसे अनेक वेळा अडचणीत आले आहेत.
Join Our WhatsApp Community