राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता राज्य सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी झपाट्याने पावले उचलायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी टास्क फोर्सची बैठक घेण्यात येणार आहे. पण त्याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मास्क सक्तीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्र्यांचा इशारा
राज्यातील कोरोना संख्यांमध्ये सध्या वाढ होत आहे. रुग्ण वाढणे हे चिंतेची बाब आहे. जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा उपमुख्यंत्री अजित पवार यांनी दिला आहे. गुरुवारी माध्यमांशी बोलत असताना अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
(हेही वाचाः पाणीप्रश्नावरुन मुख्यमंत्री संतापले आणि अधिका-यांच्या तोंडचे पाणीच पळाले)
मास्क वापरपण्याचे आवाहन
कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली तर ती कशी हाताबाहेर जाते हे आपण सर्वांनीच याआधीच्या तिन्ही कोरोना लाटांमध्ये पाहिलं आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग, राज्य सरकार, टास्क फोर्स व वैद्यकीय शिक्षण विभागागकडून याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत आहे. पण परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच जनतेने मास्क वापरपावेत, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
कोरोनाच्या वाढत्या संख्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी संध्याकाळी टास्क फोर्सची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संध्याकाळी सहा वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे.
(हेही वाचाः ‘शस्त्रक्रिया करायला गेले आणि…’ मास्कवरुन अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला)
Join Our WhatsApp Community