राज्यसभेचा रणसंग्राम होणारच! मविआची ऑफर भाजपने धुडकावली

83

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यसभेची निवडणूक इतकी चुरशीची होताना पहायला मिळत आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडी कडून भाजपला आपला उमेदवार मागे घेण्याची ऑफर देण्यात आली होती. पण भाजपने ही ऑफर धुडकावल्यामुळे आता राज्यसभेचा रणसंग्राम अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यसभा उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याची मुदत होती. पण ही मुदत संपली असून, भाजपने आपला तिसरा उमेदवार मागे घेतलेला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मविआने केलेले प्रयत्न आता अयशस्वी झाले आहेत.

(हेही वाचाः हिंदूंना बंदुका चालवण्याचं प्रशिक्षण सरकारने द्यावं; मनसेची मागणी)

मविआची भाजपला ऑफर

राज्यसभा निवडणूकीतून भाजपने तिसरा उमेदवार मागे घेतल्यास, विधान परिषदेला एक जागा आणखी देऊ अशी ऑफर मविआकडून भाजपला देण्यात आली होती. पण ही ऑफर भाजपने धुडकावली असून,आपला तिसरा उमेदवार धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय विरुद्ध भाजपचे धनंजय यांच्यात जंगी लढाई होणार असल्याचे बोलले जात आहे.

10 जून रोजी होणार मतदान

राज्यातील राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होणार आहे. शिवसेनेकडून संजय पवार आणि संजय राऊत, भाजपकडून पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक, तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून इम्रान प्रतापगढी आणि प्रफुल्ल पटेल या उमेदवांराना राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.

(हेही वाचाः पृथ्वीराज चव्हाण यांना चार वर्षांपासून भेटले नाहीत राहुल गांधी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.