पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काही दिवसांपूर्वीच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे 5 जूनच्या निमित्ताने पंजाबमध्ये अतिरिक्त सुरक्षा मागितली आहे. ही अतिरिक्त सुरक्षा दरवर्षी मागितली जाते. ही सुरक्षा मागण्यामागे कारण काय? 5 जूनला असे काय घडले होते की प्रत्येक वर्षी पंजाब या दिवशी हायअलर्टवर असतं? या मागचा इतिहास आणि कारण जाणून घेऊया.
तो दिवस होता 5 जून 1984 चा. पंजाब तेव्हा फाळणीच्या उंबरठ्यावर होता. गुरुद्वारामध्ये पंजाबला वेगळे करुन एक वेगळा प्रदेश करण्यासाठी प्रयत्न सुरु होता. अशातच देशाच्या त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. तो निर्णय होता Operation Blue Star चा.
जूनचा पहिला आठवडा होता. पंजाबला भारतापासून वेगळ करुन स्वतंत्र खलिस्तान निर्मीतीसाठी पंजाबमध्ये हिंसा भडकली होती. या हिंसेला हवा देण्याचे काम ‘दमदमी टकसाल’ चे जनरल सिंग ‘भिंडरावाले‘ यांनी केले होते. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात भिंडरावाला याने कब्जा केला होता.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानंतर, आधी ऑपरेशन सनडाऊन राबवण्यात आले. त्याअंतर्गत 200 कमांडोजना ट्रेनिंग देण्यात आले. पण या ऑपरेशनमुळे अधिक लोकांचे नुकसान होऊ शकते हे लक्षात आल्याने हे ऑपरेशन रद्द करुन Operation Blue Star सुरु करण्यात आले.
( हेही वाचा: ‘आधी लगीन कोंढाण्याचे, नंतर रायबाचे’ त्या रायबाचे पुढे काय झाले ? )
Operation Blue Star अंतर्गत भारतीय सेनेने 3 जून 1984 रोजी अमृतसरमध्ये जाऊन सुवर्ण मंदिराला घेराव घातला. त्याआधी शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. भारतीय लष्कराने 4 जूनला गोळीबार करण्यास सुरुवात केली. परंतु, कट्टरवाद्यांकडूनही सडेतोड उत्तर मिळाले. शेवटी 5 जून रोजी लष्कराने शस्त्र सज्ज गाड्या आणि टॅंकांचा वापर करण्याचा निर्णय घेतला. 5 जूनच्या रात्री कट्टरवादी आणि भारतीय लष्करात प्रचंड गोळीबार झाला.
हा गोळीबार 2 दिवस सुरु होता. प्रचंड गोळीबारानंतर भिंडरावालाचा मृतदेह मिळवण्यात सैन्याला यश आले आणि 7 जून 1984 रोजी सैन्याने मंदिरावर ताबा मिळवला. सैन्य मंदिरात घुसले आणि त्याचाच प्रचंड रोष शीख समुदायात निर्माण झाला. या ऑपरेशननंतर यावर प्रश्न उपस्थित झाले आणि शेवटी इंदिरा गांधींना आपला जीव गमावून त्याची किंमत चुकवावी लागली.
या संपूर्ण ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कराचे 83 सैनिक मारले गेले आणि 248 सैनिक जखमी झाले. याशिवाय 492 लोकांचा मृत्यू झाला आणि 1 हजार 592 लोकांना अटक करण्यात आली.