भाजप शिवसेनेमुळे महाराष्ट्रात वाढली असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला, मात्र लागलीच हा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धुडकावून लावत भाजप महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे वाढली, असे म्हटले. भाजपच्या वरचढ होण्यासाठी शिवसेना जो मुद्दा ठासून मांडत असते, त्यातील हवा शरद पवार यांनी काढून टाकली.
पुण्यात वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद २०२२चे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. तेव्हा एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत, मंत्री जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते, त्यांची मुलाखत चित्रलेखा साप्ताहिकाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी घेतली.
काय म्हणाले संजय राऊत?
महाराष्ट्रात भाजप शिवसेनेच्या मदतीने वाढली हे खरे आहे, पण आज जे विधानसभेत भाजपचे आमदार आहेत, त्यातील ७५ टक्के आमदार बाहेरचे आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आलेले आहेत. काँग्रेसवाल्यांना त्यांनी हाफ चड्डी घातली आहे. हा मूळ विचार नाही,त्यामुळे संघ परिवाराचे विष महाराष्ट्रात वाढते हे खरे नाही. त्यांनी काही लोकांना आपल्या राजकीय स्वार्थासाठी सामावून घेतले आहे. २०२४ च्या आधी अर्धे दुकान त्यांचे खाली होणार. हाफ पॅन्ट घातलेले उद्या फुल पॅन्ट शिवतील, असा दावा संजय राऊत यांनी केला. हे सरकार प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचे आहे, त्यामुळे त्यांचे विचार सर्वत्र पोहचले पाहिजे म्हणून ठाकरे सरकारने प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचे ग्रंथ छापले आहेत, प्रबोधनकार समजून घ्यायचे असतील तर हे ग्रंथ वाचले पाहिजेत आणि प्रबोधनकार नीट समजून घ्यायचे असतील तर शरद पवारांचे भाषण ठेवावे, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
काय म्हणाले शरद पवार?
शिवसेना आणि भाजप वाढीचा काही संबंध नाही. भाजप ही विचारसरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आहे आणि ती विचारसरणी स्वातंत्र्याच्या आधी महाराष्ट्रात जन्माला आली. नागपूर हे तिचे केंद्र होते आणि तेथून ती वाढत गेली हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. सुरुवातीच्या कालखंडात महाराष्ट्राने त्यांना जवळ केले नाही, पण एखादी चळवळ सुरु झाली, संघर्ष सुरु झाला आणि त्याचा त्यांनी लाभ घेतला. जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु झाली त्यावेळी जनसंघाचे लोक त्यामध्ये येऊन आपले स्थान प्रस्थापित करायला लागले. आणि त्यानंतर जनता पक्षाच्या कालखंडात त्यांनी याचा अधिक फायदा घेतला. त्यामुळे शिवसेना आणि भाजप वाढीचा काहीही संबंध नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी संजय राऊतांचे म्हणणे खॊडून काढले.