मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अजूनही अपूर्ण आहे. काम अपूर्ण असताना टोल वसुली योग्य नाही. नागरिकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन टोल वसुली करू नये. तसेच रत्नागिरी (एमएच०८) आणि सिंधुदुर्ग (एमएच ०७) या दोन्ही जिल्ह्यांतील वाहनचालकांना टोल माफी असावी, अशी मागणी प्राधिकरणाकडे केल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
( हेही वाचा : अखेर १२ वर्षाच्या तपानंतर जळगाववासीयांना मिळतेय दुसरे वन्यजीव अभयारण्य )
तूर्तास टोलवसुली रद्द
महामार्गाचे काम अधिक वेगाने व्हावे आणि टोल वसुलीसंदर्भात लवकरच केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य मंत्र्यांची भेट घेणार आहे. मुंबई-गोवा या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण नसताना एजन्सीने कुडाळ आणि राजापूर येथे टोल वसुली सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोन्ही ठिकाणी या टोल वसुलीला तीव्र विरोध झाल्याने तूर्तास टोलवसुली रद्द केली आहे. असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. महामार्गाचे काम अपूर्ण असताना एजन्सीकडून टोल वसुली करणे योग्य नाही. हा वाहनधारकांवर अन्याय आहे. ही वसुली थांबवावी, अशी आमची मागणी आहे. महामार्गावरील परशुराम घाटाचे काम ४० टक्के पूर्ण झाले आहे. पावसाळ्यात हा घाट बंद राहू नये, दरड कोसळून जीवितहानी होऊ नये, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना एजन्सीला दिल्या आहेत, असेही सामंत म्हणाले.
आंबा घाटातही गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या. काही महिने घाट वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला. प्रतिकूल परिस्थितीतही घाटाच्या दुरुस्तीचे काम सुरू ठेवले. यंदा अतिवृष्टी झाली तर दुरुस्ती केलेला भाग पुन्हा खचणारच नाही, असे सांगता येत नाही. त्यामुळे तेथे दक्षता घेण्यास सांगितले आहे, असेही सामंत म्हणाले.
Join Our WhatsApp Community