पंकजा मुंडेंचे समर्थक भाजप नेत्यांच्या विरोधात रस्त्यावर

140

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली, मात्र त्यातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव त्यामध्ये नसल्यामुळे पंकजा मुंडे नाराज आहेतच, मात्र त्याबरोबर त्यांचे समर्थकही तीव्र नाराज झाले आहेत. हे समर्थक थेट भाजप नेत्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आता पंकजा मुंडे समर्थक विरोधात भाजप असा संघर्ष महाराष्ट्रात सुरु आहे.

केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या कार्यालयावर दगडफेक 

पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी आमदारकी दिली नाही, त्यामुळे आता मुंडे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. मुंडे समर्थकांनी रविवारी, १२ जून रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. हे घटना होत नाही तोच पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी भाजप मंत्र्यांच्या कार्यालयावर दगडफेकीचा प्रयत्न केला. पंकजा यांच्या समर्थकांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या कार्यालयावर दगडफेकीचा प्रयत्न केला. यावेळी भाजप कार्यकर्तेदेखील आक्रमक झाले. त्यामुळे प्रचंड राडा झाला. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली आहे. पंकजा मुंडे यांचे समर्थक राज्यात ठिकठिकाणी निदर्शने करत आहेत. विशेष म्हणजे अहमदनगरमध्ये पंकजा मुंडे यांच्या एका समर्थकाने दोन दिवसांपूर्वी थेट आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर बीड जिल्ह्यात प्रवीण दरेकर यांचा दोन ठिकाणी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला गेला. भाजप नेते भागवत कराड यांच्या कार्यालयाबाहेर पंकजा यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. यावेळी भाजप कार्यकर्तेदेखील समोरासमोर आले. त्यामुळे तणाव वाढला. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने औरंगाबादेत मोठी दुर्घटना टळली. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी आज सकाळी पारगाव तर दुपारी बीड शहरातील बार्शी रोडवरील धांडे नगर परिसरात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मुंडे समर्थकांवर गाडी घालण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला.

(हेही वाचा राज्यसभेचाच फॉर्म्युला राज्यात सत्तापालट होणार? )

म्हणून नाराजी 

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी बुधवारी, ८ जून रोजी जाहीर केली आहे. या यादीत एकूण पाच उमेदवारांची नावे आहेत. भाजपकडून विधानपरिषदेत पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाणार अशी जोरदार चर्चा होती. पण भाजपने जाहीर केलेल्या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावांचा समावेश नव्हता. या यादीत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर, माजी मंत्री राम शिंदे, भाजप महाराष्ट्राचे संघटन सचिव श्रीकांत भारतीय, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे, राज्य भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड अशी नावे आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.