“फडणवीस यांच्यासोबत शेवटपर्यंत प्रामाणिक राहणार”

आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत

115

आमची इमानदारीची औलाद असून, बेईमानीची औलाद नाही. एखाद्याला शब्द दिला, हातात हात दिला तर शेवटपर्यंत त्याचा हात सोडत नाही. पाठीत सुरा खुपसणारी आमची औलाद नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना आम्ही शब्द दिला आहे की, तुमच्यासोबत कुणी असेल किंवा नसेल, शेवटपर्यंत प्रामाणिकपणे असणार आहे, असे शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांनी म्हटले आहे. दरम्यान आपणच आपल्या हक्काची आमदारकी आता २०२४ ला मिळवायची आहे, असे संकेतही मेटे यांनी यावेळी दिले.

हे आमच्या बापजाद्यांनी शिकवलं नाही

राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीपूर्वीच भाजपामध्ये नाराजी नाट्यावरून मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर मेटे यांनी प्रतिक्रिया दिली. उमेदवारी मिळाली नाही म्हणून बडबडत बसायचं हे आमच्या बापजाद्यांनी शिकवलं नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

(हेही वाचा – राऊतांकडून आचारसंहितेचं उल्लंघन? कारवाईच्या मागणीसाठी सोमय्या दिल्ली दौऱ्यावर!)

आगामी विधानसभा निवडणूक लढवणार!

मेटे म्हणाले की, भाजपा नेते प्रवीण दरेकर यांचा ताफा काही येड्या लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. चांगल्या कामासाठी जाताना काही येडे लोकं आडवी येतच असतात. तसेच उमेदवारी मिळाली नाही म्हणून, नाराज होऊन लगेच बाजूला व्हायचं आणि काहीही बडबडत बसायचं, काहीही करायचं, काहीही उपटसुंभ उद्योग करायचे हे आमच्या बापजाद्यांनी शिकवलं नाही. दरम्यान मित्र जरी असले तरीही कशाला कुणाला काही मागयाचं. त्यामुळे त्या दिशेने आपल्यालाच काम करायचं आहे, असेही मेटे म्हणाले. या माध्यमातून त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.