गतिमंद मुलीला मुक्ती देण्यासाठी आईकडूनच हत्या, मुंबईत आठवड्यातील दुसरी घटना

113

विलेपार्ले येथे मनोरुग्ण तरुण मुलाची आई बहीण आणि मावशीने हत्या केल्याची घटना ताजी असताना मुंबईत अशाचप्रकारची दुसरी घटना घडली आहे. एका आईने १९ वर्षाच्या मतिमंद मुलीला मुक्ती देण्यासाठी गळफास लावून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अंधेरी पूर्वेतील पारसीवाडा या ठिकाणी घडलेल्या या प्रकरणात, पोलिसांनी मतिमंद मुलीच्या आईला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे. एका पाठोपाठ घडलेल्या या दोन घटनांमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.

गतिमंद मुलीच्या आईला अटक

विलेपार्ले पश्चिम येथील नेहरू नगर परिसरात मनोरुग्ण २२ वर्षीय तरुणाची काही दिवसांपूर्वी गळा आवळून हत्या करण्यात आली होती. जुहू पोलिसांनी याप्रकरणी आई, बहीण आणि मावशी या तिघींना या हत्येप्रकरणी अटक केली होती. या घटनेला दोनच दिवस उलटलेले असताना अंधेरी पूर्वेतील पारसीवाडा येथे आई वडिलांसह राहणाऱ्या १९ वर्षीय वैष्णवी हिला गळफास देऊन तिची हत्या करण्यात आली. १५ जून रोजी वैष्णवी गळफास लावलेल्या अवस्थेत पोलिसांना घरात आढळली, मात्र वैष्णवी हिचा मृत्यु ही आत्महत्या नसावी असा संशय पोलिसांना आला व त्यांनी तपास सुरू केला असता ज्या दिवशी वैष्णवी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली त्या दिवशी तिची आई श्रध्दा घरीच होती अशी माहिती तपास अधिकाराऱ्यांना प्राप्त झाली.

( हेही वाचा : ‘बेस्ट’कडून विद्यार्थ्यांना सवलतीत ‘बसपास’! जाणून घ्या दर )

अंधेरी पोलिसांनी बुधवारी आई श्रद्धाला ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी सुरू केली असता तिनेच मुलीची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली. “माझी मुलगी जन्मापासून मतिमंद आहे, तिला स्वतःहून काहीही करता येत नाही, आम्ही नसल्यावर तिचे भविष्यात काय होईल ही चिंता सतत लागून राहिली होती, असे आई श्रद्धा हिने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून गुरुवारी आई श्रद्धा हिला अटक केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.